आरोपीस बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेप.
बारामती येथील मे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मा. ओ. ओ. शहापुरे यांचा निकाल.

बारामती: दिनांक २२/१०/२०२४ रोजी बारामती येथील मे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मा. ओ. ओ. शहापुरे यांनी आरोपी संतोष भिमराव कांबळे वय वर्षे ३७, रा. रणगांव वालचंदनगर, ता. इंदापुर जि. पुणे यांस अल्पवयीन पिडीत मुलगी (वय ९ वर्षे ) हिचेवर बलात्कार केल्याप्रकरणी आजीवन सश्रम कारावास, त्याच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरीत काळापर्यंतचा भोगण्याची शिक्षा सुनावली आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी कि
दिनांक १५/१०/२०१६ रोजी आरोपीसंतोष भिमराव कांबळे हा त्याच्या नातेवाईकाच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी मौजे कटफळ, ता. बारामती, जि. पुणे येथे आलेला होता. त्यादिवशी संध्याकाळी ६ वाजणेच्या सुमारास त्याने पिडीत मुलीस यात्रेतील उड्या मारणा-या भावल्यावर बसवतो, तसेच तुझे मामाने पाण्याची बाटली आणायला सांगितली आहे असे म्हणून पिडीत मुलीच्या हातात १००/- रुपयाची नोट देवून तीला जबरदस्तीने त्याच्या मोटार सायकलवर बसवले व तीला मौजे कटफळ ते गाडीखेल जाण-या रोडच्या उत्तरेस असलेल्या कल्याणी कंपनीच्या लगतच्या फॉरेस्टच्या लगत असलेल्या पडीक जमिनीमध्ये नेवून त्या ठिकाणी तीला जिवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर तीन वेळा जबरदस्तीने बलात्कार केला व त्यानंतर तीला पुन्हा मोटार सायकलवर बसवून कटफळ गावात आणून सोडले.
त्यावेळी तिची आजी तिचा गावात शोध घेत असताना पिडीत मुलगी रस्त्यावर मिळून आली. तिने आजीस घडलेला प्रकार सांगितला व आरोपीसही दाखवले. पिडीत मुलगी गावातील यात्रेसाठी तिच्या आजीकडे आली होती. ती दुकानातून कुरकुरे / खाऊ घेवून तिच्या आजीच्या घरी
जात असताना आरोपीने तिला रस्त्यामधे अडवून तीला मोटार सायकलवर बसवून घेवून तीला वरील ठिकाणी नेले व तिच्यावर बलात्कार केला होता.
याबाबत त्याच दिवशी पिडीत मुलीच्या आजीने आरोपीविरुध्द बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दिली होती. आरोपीने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे पिडीत मुलीची प्रकृती गंभीर झाली होती. तिच्यावर बारामती येथील सरकारी दवाखाना व त्यानंतर ससून रुग्णालय पुणे येथे औषधोपचार करण्यात आले होते. सदरील गुन्हयाचा तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक श्री. सी.जी. कांबळे यांनी केला व आरोपी विरुध्द पिडीत मुलीवर बलात्कार केल्याबाबत दोषारोप पत्र बारामती येथील न्यायालयात दाखल केले होते.
सदर फौजदारी खटलयाचे कामकाज शासनातर्फे श्री. संदिप ओहोळ विशेष सरकारी वकील यांनी चालविले. त्यांनी या प्रकरणांत एकूण ०९ साक्षीदार तपासले. यामध्ये पिडीत मुलगी, तिची आजी, वैदयकीय अधिकारी, पिडीत मुलीस आरोपी मोटार सायकलवरुन घेवून जाताना पहाणारे साक्षीदार तसेच तपासी अधिकारी यांची साक्ष व डी.एन.ए. अहवाल केस शाबीतीकामी महत्वाचा ठरला.आरोपीने गुन्हा केल्याचे सिध्द झाले असून, आरोपीने केलेला गुन्हा हा अतिशय गंभीर व निंदनीय असल्याने आरोपीस आजीवन जन्मठेपेची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी व युक्तीवाद विशेष सरकारी वकील श्री. संदिप ओहोळ यांनी केला होता. तो मान्य करुन मे. न्यायालयाने आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ (२) अन्वये सश्रम आजीवन कारावास त्याच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरीत काळापर्यंतचा भोगण्याची व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली. तसेच पोक्सो कायदा कलम ६ अन्वये सश्रम आजीवन कारावास व ३ हजार रुपये दंड तसेच जीवे मारण्याची धमकी दिलेबाबत भा.द.वि. कलम ५०६ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा एकत्रित भोगण्याचा आदेश करुन निकाल दिला.