बारामती ग्रामीण प्रतिनिधी.
बारामती: विधानसभा मतदारसंघात गेल्या ५७ वर्षांनंतर पहिल्यांदाच निकालाची उत्सुकता असणार आहे. आतापर्यंत बारामतीचा निकाल हा एकतर्फी राहिला आहे.अनेकदा विरोधकांचे डिपॉझिट देखील जप्त व्हायचे आणि झालेही आहे पण यंदाची निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय असंतोषाच्या लढाईपेक्षा बारामतीचा तालुक्याचा नवा वारसदार कोण? हे ठरविणारी असणार आहे. शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमधील मनभेदानंतर अजित पवार आणि युगेंद्र पवार या काका-पुतण्यांची बारामतीवरील वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांनी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे बारामतीकरांना रुचले नव्हते. खासदार सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा एक लाख ५३ हजार मतांनी पराभव केला होता. बारामतीकरांचा हा कल पाहिल्यावर अजित पवार हे या वेळी बारामतीतून निवडणूक लढवायची की नाही, या संभ्रमात पडले होते. त्यांनी शिरूर किंवा पुरंदरमधून निवडणूक लढविण्याचा पर्याय तपासून पाहिला. कार्यकर्त्यांची नाराजी व बारामती कर जनतेतून काहीप्रमाणात भावनिक वातावरण तयार झाल्यावर अजित पवारांनी बारामतीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीनंतर तयारीला सुरुवात केली होती. युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये ‘स्वाभिमानी यात्रा’ काढून गावागावांमध्ये भेटी दिल्या. तेव्हाच त्यांना उमेदवारी मिळणार, याचा अंदाज लागला होता. आणि झालेही तसेच,
खरे तर युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता काका-पुतण्यांची ही लढाई म्हणजे बारामती हि नवीन पिढीच्या ताब्यात द्यायची की जुन्या पिढीच्या हातात कायम ठेवायची अशा गंभीर अडचणीत बारामतीकर पडले आहेत.परंतू याचाही निर्णय बारामतीकरच घेणार आहेत.
यावेळी मतदारसंघातील मतदार यांचा कौल पाहता आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील लोकसभेला झालेली सभा आणि त्यातील ‘भटकती आत्मा’ याचा झालेला परिणाम पाहता अजित पवार यांनी सावध पवित्रा घेत मोदींची सभा बारामती मध्ये ठेवली नाही.अशी मतदारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
तूर्त आत्तातरी या रंगतदार लढतीकडे समस्त बारामतीकरांसह राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा