
बारामती: घरात अठराविश्व दारिद्र्य, इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी उन ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता फक्त कष्ट आणि कष्टच करत आयुष्यभराची वनवन करत सोनाजी पवार व फुलाबाई पवार हे मूळचे बीड जिल्ह्यातील कुटुंब १९९८ साली कामाच्या शोधात बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे आले.

पाईपलाइन,दगडाची कामे, लोकांच्या शेतात कष्ट करत करत संसाराचा गाडा पुढे ढकलला कुटुंबातील दोन लहान लेकरांना शिक्षण देत मोठी केली.
सोनाजी व फुलाबाई हे शिक्षणाने अडाणी परंतू त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत मात्र कोणतीच कसर ठेवली नाही. शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुलांना योग्य दिशेने शिक्षण दिले, संस्कार दिले आणि दोन्ही मुलांनीही त्यांच्या मेहनतीने कष्टाने पोलीस खात्याची खाकी वर्दी मिळवली.

त्यांची मुलगी पूजा व मुलगा राहुल यांनीही कॉलेज शिकत आपल्या आई वडिलांना मदत केली. दरम्यान पूजाने बारावी नंतर मेहनत करून २०२३ साली मुंबई पोलीस खात्यात खाकी वर्दी मिळवली.
तर आपल्या बहिणीचा आदर्श ठेवत राहुलनेही कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून सोबत दगड फोडत मातीशी दोन हात करत पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली व त्यानेही अखेर २०२५ म्हणजेच चालू वर्षी पुणे पोलीस दलात पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

आपल्या आई वडिलांच्या कष्टाची व गरीबीची जाणीव ठेवत त्यांचे आयुष्यभराचे दैन्य संपवले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
एकाच कुटुंबातील दोघांनीही पोलीस दलात भरती होऊन दाखवून,परिस्थिती कशीही असली तरी त्यातून यश मिळवता येते व परिस्थिती बदलता येते हा मोलाचा संदेश या निमित्ताने दिला आहे असे म्हणता येईल.
पूजा व राहुलच्या या यशानंतर पवार कुटुंबीय व समस्त कोऱ्हाळे बुद्रुक येथील ग्रामस्थ आनंदित झाले असून आमच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आईवडील सोनाजी व फुलाबाई पवार यांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा