
बारामती : माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील खांडज ता. बारामती जि.पुणे या गावचे हद्दीत काल दिनांक ०७/०५/२०२५ रोजी स. ०७.०० वा.चे सुमारास शेतविहिरीत एक पुरुष जातीचे प्रेत तरंगत असल्याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील श्री. मुनेश राऊत यांना मिळाल्याने त्यांनी सदरची खबर माळेगांव पोलीस ठाणे येथे कळविलेली होती.
त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री. सचिन लोखंडे व पोलीस उपनिरीक्षक श्री.अमोल खटावकर व इतर पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवुन सदरचे प्रेत विहिरीच्या बाहेर काढून प्रेताची व्यवस्थित पाहणी केली असता त्याचे डोक्याला तसेच चेहऱ्यावर मार लागल्याच्या खुणा तसेच मयताच्या मानेला साडी व दगड बांधलेल्या अवस्थेत मिळुन आले होते. मयत व्यक्तीचा मृत्यू हा संशयास्पद झालेला असावा असे वाटल्याने,कायदेशीर तपास प्रकीया पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदना करीता शासकीय उपजिल्हा रुग्णालय, बारामती येथे पाठविलेले होते.

दरम्यानच्याच कालावधीत श्री. शिवाजी साहेबराव रोमन रा.खांडज ता. बारामती यांनी सदरचे प्रेत हे त्यांचा भाऊ मारुती साहेबराव रोमन यांचे असल्याचे सांगितले.
घटनेतील मयत प्रेताचे शवविच्छेदन केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मयत मारुती साहेबराव रोमन यांचा मृत्यु हा त्यांच्या डोक्यात कोणत्या तरी टणक वस्तूने मारहाण केल्याने झालेला असावा असा संशय व्यक्त केल्याने सदरचा मृत्यु हा नैसर्गिक किंवा आत्महत्या नसुन तो खून झालेला असल्याचे निष्पन्न झालेले होते.परंतु घटनास्थळ परिसरात जास्त लोकवस्ती नसल्याने पोलीसांना चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळावर काही उपयुक्त माहिती मिळत नव्हती.
घटनेचे गांभीर्य ओळखुन स.पो.नि.श्री. सचिन लोखंडे यांनी घडल्या प्रकाराबाबत वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मयत मारुती साहेबराव रोमन यांच्या झालेल्या खूनाचे अनुषंगाने यातील मयत व्यक्ती यांचा मुलगा फिर्यादी श्री. विजय मारूती रोमन रा. राऊतवस्ती खांडज, ता. बारामती, जि. पुणे यांनी माळेगाव पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून फिर्यादीचे वडील मारूती साहेबराव रोमन वय ५८ वर्षे, रा. राऊतवस्ती खांडज, ता. बारामती, जि.पुणे यांचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तु मारून त्यांचा खून करून त्यांचे प्रेताच्या गळयात काळ्या रंगाच्या साडीमध्ये दगडे बांधून पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने कांतीलाल सयाजी माने यांचे विहीरीमध्ये टाकुन दिलेले आहे. अशी फिर्याद दिली फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाणे येथे गुरनं -117/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 103 (1), 238 या प्रमाणे गुन्हा दाखल करुन घेवुन सदर खूनाचा प्रकार उघडकीस आणुन आरोपीचा शोध घेण्याकरीता माळेगाव पोलीस ठाणे यांचेकडील गुन्हे शोध पथक तसेच इतर पोलीस अंमलदार यांची दोन पथके तपासासाठी रवाना केलेली होती.
सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान खांडज ता. बारामती या गावचे हद्दीत कसुन चौकशी करुन यातील मयत मारुती साहेबराव रोमन यांचे कुटुंबातील किंवा बाहेरील कोणाशी यापुर्वी वाद विवाद झालेला होता का? किंवा अजून काही तसेच मयत व्यक्तीस शेवटी कोणी पाहिले होते का याबाबत कसून चौकशी केली असता तपास दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मयत व्यक्ती हा घटना घडण्यापूर्वी मौजे खांडज ता. बारामती या गावात मजुरी कामासाठी बाहेरुन आलेल्या लोकांसोबत फिरताना पाहिल्याचे खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने मयत व्यक्तीचे प्रेत मिळुन आलेल्या विहीरी पासुन थोडे अंतरावर तात्पुरता निवारासाठी खोपी बांधुन राहणाऱ्या नवनाथ शिवाजी घोगरे, वय २५ वर्षे, मुळ रा. कार्ले लोणावळा ता. मावळ जि.पुणे व अनिल गोविंद जाधव, वय ३५ वर्षे मुळ रा. आंबेवाडी ता.रोहा जि.रायगड यांचेकडे मारुती साहेबराव रोमन याचे बाबत चौकशी केली असता त्यांनी त्या व्यक्तीस ओळखत नसल्याचे सांगुन उडवा- उडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांचे घरातील मजुरी काम करणारे इतर महिलांकडे माळेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकातील महिला अंमलदार यांनी चौकशी केली असता महिला व पुरुष मजुर हे सांगत असलेल्या माहितीमध्ये विसंगती निदर्शनास आल्याने पोलीस चौकशीत काहीतरी माहिती लपवत असल्याबाबत खात्री झाली, नमूद घटनेच्या अनुषंगाने अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी यातील मयत व्यक्ती हा अधुन मधुन मजुरांच्या खोपीवर येत जात होता, याच ओळखीतुन मयत मारुती साहेबराव रोमन याने मजुरी काम करणारा नवनाथ घोगरे याचे आईकडे शरीर सुखाचे मागणी केलेली होती, तो प्रकार त्या महीलीने तीचा मुलगा यातील आरोपी अनिल गोविंद जाधव यांस सांगितल्याने त्याचा राग मनात धरून मयत व्यक्ती मारुती साहेबराव रोमन यास विश्वासात घेवुन त्यास गोड बोलुन त्या परीसरातील निर्जन स्थळी नेवुन त्याच्या डोक्यात दगड घालुन त्याचा खून केला असल्याचे व मयताची ओळख पटु नये म्हणुन त्याची कपडे काढुन गुन्हयाचा पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने ती पेटवून दिली तसेच त्याचे प्रेत काही कालावधी करीता त्याच परीसरातील ऊसाचे शेतात लपवून ठेवून नंतर रात्रीच्या अंधारात त्या प्रेताचे हात पाय बांधुन ते प्रेत पाण्याचे वर येवु नये म्हणून साडीच्या सहाय्याने मोठ्या दगडांना बांधुन विहीरीत टाकुन दिले असल्याचे कबूली दिली.

सदर गुन्हयातील आरोपी नवनाथ शिवाजी घोगरे व अनिल गोविंद जाधव यांना अटक करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. तुषार भोर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री.पंकज देशमुख सो. (मा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री. गणेश बिरादार सो.. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अमोल खटावकर, तुषार भोर, सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय मोहीते, पोलीस हवालदार सादीक सय्यद, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, महिला पोलीस हवालदार रुपाली घिवार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप, पोलीस कॉन्टेबल ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, अमोल कोकरे, विकास राखुंडे, जालींदर बंडगर, सागर पवार, महिला पोलीस कॉन्टेबल सुनिता पाटील यांनी केलेली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा