
बारामती: तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील कुमारी अंकिता शेखर कडाळे वय १५ वर्ष या शाळकरी मुलीने साधारण मागील दोन महिन्यांपूर्वीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती,काल दहावीचा निकाल लागला आणि त्यामध्ये तिला ७८.४० टक्के गुण मिळाले असल्याची बातमी तीच्या घरच्यांना मिळाली या सुखद बातमीने खरंतर आई वडिलांनी आनंद साजरा करायचा असतो परंतु तसे न होता त्यांनी अक्षरशः आकांताने हंबरडा फोडला.
त्याला कारणही तसेच होते, गावातील काही टुकार, दिशाहीन मुलांच्या त्रासाला कंटाळून एप्रिल महिन्यात अंकिताने आत्महत्या केली होती,व आज ती दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेलं, तीला मिळालेलं यश साजरं करायला,पहायला आणि तीचा आनंदोत्सव साजरा करायला ती या जगात नाही.

एका अतिशय गरीब कुटुंबात वाढलेली जिद्दी,हुशार, महत्वकांक्षी मुलगी, शिकून मोठे होवून डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न होते,अशा दूरदृष्टी असलेल्या कोवळया मुलीला आपले आयुष्य अशा रितीने संपवण्यास भाग पाडले.

गावातील विशाल दत्तात्रय गावडे व त्याचे मित्र प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हे तीचा मागील अनेक महिन्यांपासून पाठलाग करत तिला मानसिक त्रास देत होते,विशाल दत्तात्रय गावडे हा फोनवरील मेसेज वर धमक्या देत होता, माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशा प्रकारच्या धमक्या देत होता. सोबतचे मित्र तीला शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करत होते.

सतत होणारा पाठलाग व दहशतीला अंकिता कंटाळली होती. दरम्यानच्या काळातच गावच्या यात्रेच्या आधी तु माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याने अंकीता भयभीत झाली व यासर्व त्रासाला कंटाळून दिनांक ८ एप्रिल रोजी तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती.

ज्यांनी आत्महत्या करायला भाग पाडले त्या चौघांच्या विरोधात वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.आरोपींपैकी केवळ एकाला अटक करण्यात आलेली होती.उर्वरित आरोपींना लवकर अटक व्हावी यासाठी तिचे आई वडील पोलीस प्रशासनाला विनवणी करत आहेत,

अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत, आपल्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून भिक मागत आहेत.
उरलेल्या आरोपींना लवकरात अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली तरचं त्या कोवळ्या जीवाला शांती लाभेल व तीच खरी श्रद्धांजली असेल असे तिच्या दुर्दैवी पालकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

एका महत्वकांक्षी, हुशार व भविष्यातील डाॅक्टर मुलीच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या आरोपींना एवढे दिवस होवूनही अटक नाही हे पोलीसांचे अपयश नाही का?
असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा