Breaking
ब्रेकिंग

राजकीय ईर्षा हाच शरद पवार यांचा मनसुबा ?

0 1 4 5 6 9

                  ……विशेष लेख……

महाराष्ट्रातील विधानसभा २०२४ निवडणुकांचे बिगुल वाजले व निवडणूक आयोगाचे सर्व सोपस्कार पार पडून राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात झाली.व अगदी काही दिवसातच निवडणूक प्रक्रिया (मतदान) पार पडेल.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा मतदार संघ म्हणजे बारामती विधानसभा.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तर हा मतदारसंघ खूपच प्रकाश झोतात आहे. या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उफाळलेला आहे. पवार विरुद्ध पवार म्हणजे एक विद्यमान आमदार अजित पवार आणि दुसरे त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार, मध्यंतरीच्या पक्ष फुटीच्या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले.एक अजित पवार गट व एक शरद पवार गट, दोन्ही गटातील वर्चस्वाचा लोकसभेलाही कौटुंबिक संघर्ष पाहायला मिळाला. आणि आता विधानसभेसाठी पवार विरुद्ध पवार अशी कौटुंबिक सरळ लढत पाहिला मिळत आहे. सध्या ही लढाई अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी नसून, अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे.त्याला कारणही तसेच गंभीर आहे आपल्याला राजकीय पातळीवर आव्हान देणाऱ्या पुतण्याच्या म्हणजेच अजित पवार यांच्या विरोधात स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी,अस्तित्वासाठी लढा उभा करणे व अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे,हि एकमेव राजकीय ईर्षा शरद पवार बाळगून आहेत,असा एक सर्वसामान्य समज जनतेच्या मनात आहे.
त्यातच लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांना काही जागा जास्त मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोबल वाढलेले दिसत आहे, बारामती लोकसभेत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून निवडून आल्या व खासदार झाल्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे(शप) सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांना विधानसभेत बारामती आपल्याच शब्दाला जागेल! असा प्रचंड विश्वास वाटत असावा,त्यामुळे त्यांनी पुतण्याच्याच पुतण्याला, पुतण्या विरूद्ध उभा करण्याचा कुटिल डाव रचला आहे व पवार कुटुंबात अजित पवार यांना एकटे पाडून आपल्याच घरातून आव्हान उभे केले आहे. हि भावनिक खेळी करण्यामागेही राजकीय स्वार्थ नसावा का?
खरंतर अजित पवार यांच्या विरोधात कोणताही आयात केलेला उमेदवार किंवा तालुक्यातील कोणताही राजकीय नेता, पुढारी असलेला उमेदवार टिकणार नाही याची पूर्ण जाणीव असल्याने शरद पवार यांनी हि भावनिक अशी विचारपूर्वक केलेली खेळी असावी, मग हि राजकिय ईर्षा नव्हे काय?
विद्यमान आमदार अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून, नेहमी विकासाला महत्त्व देऊन मागील ३०-३५ वर्षात या मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे, खरंतर आजपर्यंतच्या इतिहासात बारामती विधानसभा हा नेहमी ‘एककली’ निवडणूक होणारा मतदारसंघ राहिला आहे. त्याला कारणही तसेच आहे या मतदारसंघावर मातब्बर राजकारणी पवार आडनावाचे (घराणेशाहीचे) वलय राहिले आहे.(याचीच पुनरावृत्ती सध्या पाहिला मिळत आहे) आणि यातूनच शरद पवार व अजित पवार ही प्रचंड ताकदीची नेतृत्व बारामतीकरांनी अनुभवली आहेत.

भारतीय असो किंवा महाराष्ट्राचे,राजकारण म्हटलं की एक नाव प्रकर्षाने समोर येते ते म्हणजे शरद पवार.भारतीय राजकारणात आज तागायत आदराने व सन्मानाने घेतले जाणारे नाव शरद पवार. अगदी शालेय जीवनात वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणाचे बाळकडू मिळालेलं हे प्रभावशाली नेत्रुत्व १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून राजकीय प्रवासाला सुरूवात झाली व आजपर्यंत ‘बारामती ते संसदभवन’, हा देशाच्या राजकारणातील राजकीय प्रवास शरद पवार यांनी केला आणि आजही वयाच्या नव्वदीकडे असतानाही सुरू आहे व तो सर्वश्रुत आहे.

एक अभ्यासू,शिस्तबध्द,मुत्सद्दी,अन्‌ दूरदृष्टी असलेला नेता म्हणून शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपली छाप ठेवली आहे.शरद पवार हे देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नाव आहे.खरंतर त्यांची सुरुवातीपासूनची राजकीय वाटचाल उत्साहवर्धक, रोमांचकारी, प्रेरणादायी आहेच,आणि त्याचबरोबर ती बऱ्याचअंशी वादग्रस्त सुद्धा राहिली आहे.

शरद पवारांच्या राजकीय वाटचालीवरील काही घटना पाहू ज्या सर्व परिचित आहेत.

१९७७ मधील आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले. यशवंतराव चव्हाण यांच्यासह वसंतदादा पाटील, शरद पवार हे ‘रेड्डी कॉंग्रेस’मध्ये गेले.
१९७८ मध्ये निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र आले. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. मात्र या सरकारमधल्या अनेक नेत्यांसह शरद पवार हेही अस्वस्थ होते असे बोलले गेले.व त्यानंतर
याच काळात शरद पवार हे आपल्या मर्जीतील ४० समर्थकांसह बाहेर पडले आणि आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर जुलै १९७८ मध्ये ‘पुरोगामी लोकशाही दलाचे’ नेते म्हणून शरद पवार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. व ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.त्यानंतर शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करण्यात आली व ती पुढे अनेक वर्षं होत राहिली,आजही होत आहे.

१९८० ला महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. पवारांना पायउतार व्हावे लागले. नंतर इंदिरा काँग्रेस सत्तेत आली आणि बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
त्यानंतर पवार विरोधी बाकावर बसले.
पवारांनी १९८७ साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या व अशा अनेक घटना आहेत. हे करत असताना यात राजकिय स्वार्थ,राजकीय ईर्षा नव्हती का?

अशा खूप घटना राज्यातील जनतेला माहीत आहेत देशाला माहीत आहेत. ज्याचा उल्लेख करने आता तरी योग्य नाही. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द काढून पाहिली तर त्यांनी अगदी सुरुवातीपासून मुत्सद्दीपणाने राजकारण केले आहे व राजकारणात आपली स्वतःची एक वेगळी ओळख करून ठेवलेली आहे, सत्ताकारणात राजकीय वर्चस्व असणे ही खूप प्रतिष्ठेची बाब आहे व तीच कायम ठेवण्यासाठी शरद पवार आजपर्यंत राजकारण करत आले आहेत व करत आहेत.

मध्यंतरी म्हणजेच दोन्ही पवार एकाच पक्षात असताना शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय वारसा कोणाकडे जाणार यावरून पक्षात संघर्ष सुरू होता. अशातच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त केले व त्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आता पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती जाणार हे स्पष्ट झाले, यामुळे पक्षातील ज्येष्ठ, वरिष्ठ नेत्यांमध्ये वेगळ्या अपेक्षांनी धुसपुस सुरू होती. बऱ्याच जणांचे मत असे होते शरद पवार हे अजित पवार यांना पक्षाचा राजकीय वारसा देतील पण प्रत्यक्षात तसे घडले नाही त्यामुळे पक्षांतर्गत पेच निर्माण झाले.
दरम्यानच्या काळातच भाजप कडून अजित पवार यांच्यावर विविध यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गत मतभेद व विविध यंत्रणांचा दबाव या द्विधा मनस्थितीत असलेल्या अजित पवार यांनी आपला स्वतःचा निर्णय घेण्याचे ठरवले व ते भाजप सोबत गेले यानंतर राज्याच्या सत्ताकारणात खूप उलथापालथ झाली त्यानंतर मात्र दोन्ही पवारांमधील संघर्ष एका वेगळ्या स्थितीवर पोहोचला जो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. दरम्यानच्याच काळात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या यात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन हा संघर्ष एका विशिष्ट टोकाला घेऊन जाण्याचे काम अजित पवारांनी केले. लोकसभेला अजित पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले हि वस्तुस्थिती आहे परंतु लोकसभेला सुनेत्रा पवार यांना उभे करणे हि आपली भूमिका चुकीची होती हे मान्य करत आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला परंतु तो शरद पवार समर्थकांच्या मनाला रुचलाच नाही, यातूनच बारामती मतदारसंघात जनतेतही दुफळी निर्माण झालेली पहायला मिळते आहे.
राजकीय रणनीतीत एकापेक्षा एक असे सरस डावपेच खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवडून आणत अजित पवारांना चितपट केले हे तर दाखवून दिलेच, पण आता बारामती विधानसभा निवडणुक २०२४ च्या निमित्ताने युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवून अजित पवार यांच्यासमोर घरातूनच आव्हान उभे केले आहे.

खरंतर यामागेही शरद पवार यांची राजकीय इर्षा व राजकीय स्वार्थ असावा,शरद पवार हे शेवटी म्हणजेच १९९३ ते १९९५ या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत.आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत आपल्यानंतर पवार कुटुंबाकडे मागील कित्येक वर्षात मुख्यमंत्री पदाची खुर्ची नाही हे शल्य कदाचित त्यांना बोचत असावे, आता अजित पवार यांनी दुसरा घरोबा केल्यामुळे पवारांपुढे नवीन पर्याय उभे आहेत.

शरद पवार सध्या ज्या पद्धतीची राजकीय खेळी खेळत आहेत त्यावर असं म्हटलं जातय की,भविष्यात शरद पवार यांच्या हाती सत्तेची चावी आली किंवा तशा काही संधी निर्माण झाल्याच तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा विचार केला जाऊ शकतो.

हिच सध्याची शरद पवार यांची राजकीय खेळी असावी. त्यांना पूर्ण जाणीव आहे महाविकास आघाडीत माझ्या शब्दाच्या बाहेर कोणी जाणार नाही व त्याचाच राजकिय फायदा घेऊन आपल्या लेकीला राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवून मी माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करून दाखवेन, व महाराष्ट्र राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री करून दाखवली हा इतिहास निर्माण करेन,अशी राजकिय स्वार्थाची अफाट महत्वाकांक्षा ठेवून आणि तसा अनिश्चित प्रयत्न सध्या पवार यांच्या मनात घोळत असावा.

राजकीय लालसेपोटी आपल्या वयाचा कोणताही विचार न करता देश पातळीवर सत्ता कारण गाजवणारा व्यक्ती आज आपल्याच मतदार संघात जिथून स्वतःच्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली त्याच तालुक्यात नातवासाठी व पक्षाच्या अस्तित्वासाठी गल्लो गल्ली,दारोदारी फिरतोय किंवा फिरावे लागते आहे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

व एवढ्या मोठ्या नेत्यासाठी ती अशोभनीय आहे.
परंतु राजकीय लालसा कधीही न संपणारी गोष्ट आहे असे म्हणतात,आणि शरद पवार यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याच्या तयारीत आहे किंबहुना जात आहेत.
नव्वदीतला तरुण आजही समाजकारणासाठी फिरतोय हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी त्यामागे राजकीय लालसाच आहे. मी राज्यातील सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही! यामागेही राजकीय लालसाच आहे,
जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी लोकांनी आपल्याच सोबत राहावे यासाठी शरद पवार हे जाणीवपूर्वक भावनिक खेळ खेळत आहेत.
कधी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा करून तर कधी राजकीय निवृत्तीचे संकेत देऊन जनतेच्या मनाशी भावनिक खेळ खेळत राजकीय डावपेचही टाकत आहेत.

शरद पवार यांच्या कारकिर्दी विषयी वाचन करत असताना, त्यांना १९६६ साली युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली होती व त्याअंतर्गत त्यांना परदेशी जाऊन तेथे राजकीय पक्षांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली त्यात प्रामुख्याने पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला असे वाचण्यात आले. हा संदर्भ एवढ्यासाठी कि,
महायुती सरकारमध्ये सामील होण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असा आरोप करण्यात आला व त्यानंतर अजित पवार यांनी पक्ष व चिन्हावरही निवडणूक आयोगाच्या निकालाच्या माध्यमातून आपली मालकी सिद्ध केली.(ही गोष्ट शरद पवार यांच्या खूप जिव्हारी लागलेली आहे) घडलेल्या घटनेत राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या पक्षबांधणीचा जो काही अभ्यास शरद पवार यांनी केला होता त्यात ते नापास झाले असा याचा अर्थ होतो का?
स्वतःच्या राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द होणे, देशातील विविध राज्यात पक्षाचे अस्तित्वच नसणे व स्वतःच्या राज्यातही स्वपक्षाची झालेली वाटणी होणे हे सर्व आपल्या राजकीय स्वार्थाचे फलित नव्हे काय?
मी भारतीय राजकारणात एवढे वर्ष काम करत आहे ही प्रखर ईर्षा आणि आताही जनतेने माझेच ऐकावे मी सांगेल तेच करावे. म्हणजेच मी दिलेल्या उमेदवारालाच निवडून द्यावे, हा अट्टाहास का? हा फक्त बारामती विधानसभा मतदारसंघासाठी समस्त बारामतीकरांचा प्रश्न आहे.
तुम्ही तुमच्या राजकीय ईर्षेसाठी राजकीय स्वार्थासाठी राज्याच्या राजकारणात तुमच्या पेक्षाही दोनपटिने मुसंडी मारत राजकारण करीत असलेल्या घोड्याचे पाय तोडण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना?
आणि त्यासाठी बारामतीकर जनतेसमोर दुसरा पर्याय उभा केला आहे,ज्या पर्यायाला कोणताही राजकीय किंवा कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेला फक्त तो तुमचा आहे म्हणून (थेट वशिल्यावर) थेट आमदारकीसाठी जनतेसमोर उभे करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहात काय?
फक्त तुम्ही सांगताय म्हणून त्या पर्यायाला बारामतीकरांनी का नेतृत्व द्यावे? हाही बारामतीकरांच्या समोरचा प्रश्न आहे.
बारामतीकर जनता खूप सुज्ञ व जाणकार आहे ते आपला मौलिक अधिकार बजावून त्यांना हवा असलेला उमेदवार नक्कीच या बारामतीसाठी निवडून देतील यात शंकाच नाही.

परंतू तुम्ही जे भावनिक,कौटुंबिक नाट्य बारामतीकरांच्या समोर उभे केले आहे त्यातून तुमच्या संकुचित विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तुम्ही व तुमची राजकीय भूमिका नेहमीच अनाकलनीय राहिली आहे, परंतु आताचा तुमचा मनसुबा जनतेच्या लक्षात आला आहे.

तुम्ही स्वतःला मातीतले,शेतीतले, जनसामान्यांचे नेते समजता,आमच्याकडे याच जनसामान्यांमधील जुने जाणते वयोवृद्ध लोक स्वतःच्या हयातीत उभा केलेला संसार,घरदार, गुरेढोरे, पैसा अडका, सर्व त्यांच्यानंतरच्या पिढीकडे सोपवून कधी पंढरीच्या वारीला तर कधी काशीच्या वारीला निघून जातात.
आमचे कार्य आता संपले आहे आता हा संसार तुम्हाला जमेल तसा सांभाळा आम्हाला परत यायची खात्री नाही.असे म्हणून आपल्या कर्तव्यातून मुक्त होताना दिसतात, परंतु तुम्हाला अजूनही राजकीय लालसा आहे हे यानिमित्ताने स्पष्ट जाणवते आहे आणि नेमकी तीच गोष्ट याठिकाणी जनतेला रूचताना दिसत नाही.
आपल्या ग्रामीण भागात कित्येक ठिकाणी अज्ञानी,अशिक्षित अगदी सुशिक्षित घरांमध्ये ही बापलेकांमध्ये कौटुंबिक वाद होत असतात, बऱ्याचदा मुलगा चुकतो,तो दुसरा घरोबा करत असतो, आई-वडिलांना सोडून तो दूर राहतो परंतु ते अज्ञानी,अशिक्षित आई बाप आपल्या मुलाचे कधीच ‘अहित’ पहात नाहीत हा त्यांचा मनाचा मोठेपणा व एक संस्कार असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

परंतु हा विचार आतापर्यंत आपल्याला का शिवला नाही हा एक गहन प्रश्न आहे.

असं म्हणतात राजकीय ईर्षा किंवा अहंकार हे राजकारणात अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील विषय आहेत. यामध्ये व्यक्तीला आपापसातील स्पर्धा, सत्ता हडपण्याची इच्छा किंवा अन्य व्यक्तीच्या यशाकडे किंवा सत्तेकडे पहाण्याचा दृष्टीकोन किंवा एक नकारात्मक भावना असू शकते. यामध्ये कधी स्पर्धा व असमाधान आणि कधी कधी द्वेषही असतो अनेक वेळा एखाद्या नेता किंवा पक्षाच्या यशामुळे इतर राजकारणी त्यांच्या स्थानावर शंका उपस्थित करतात, ज्यामुळे भेदभाव आणि संघर्षाची स्थिती निर्माण होते.अहंकार म्हणजे स्वतःच्या क्षमतांचा किंवा आपल्या अती आत्मविश्वासाचा गर्व असणे. राजकारणात हा अहंकार अनेकदा निर्णय प्रक्रियेत अडथळा आणणारा ठरतो.
याचा परिणाम अहंकारामुळे व्यक्ती आपल्या चुकांवर लक्ष देत नाही,ज्यामुळे धोरणात्मक चुका होऊ शकतात.
ईर्षा आणि अहंकारामुळे समाजात तणाव आणि संघर्ष वाढतो. यामुळे समाजातील एकता कमी होते.
राजकीय अस्थिरता येते या भावनांमुळे सरकारे अस्थिर होऊ शकतात,जो परिणामस्वरूप निवडणुकीत उलथापालथ करतो. राजकारणी लोक अनेक वेळा आपल्या स्वार्थासाठी नैतिकतेचा त्याग करतात,ज्यामुळे लोकांचा विश्वास कमी होतो.

राजकीय ईर्षा अनेकदा दुसऱ्या व्यक्तीच्या राजकीय वाटचालीवर,सामाजिक प्रतिष्ठेवर,आणि सत्तेवर प्रभाव टाकणारी असु शकते. ही ईर्षा व्यक्तीला असुरक्षितता,असमाधान,आणि द्वेषाकडे नेऊ शकते. यामुळे राजकीय निर्णय प्रक्रियेत ताण निर्माण होतो.

आजच्या काळात अनेक नेते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या यशावर संदेह( ? उभे) करतात.
अहंकारामुळे व्यक्ती सहसा इतरांचे मत ऐकण्यात कमी रस घेताना दिसतात.काही राजकीय नेत्यांना त्यांच्या निर्णयांबद्दल विचारले असता ते प्रतिक्रिया न देता किंवा ती गोष्ट लक्ष देण्यासारखी नाही असे दाखवतात, आपल्या विचारावर निर्णयावर ठाम राहणे त्यांना जास्त आवडते, ज्यामुळे जनतेत एक असमाधानाची भावना तयार होते.
अहंकारामुळे नैतिक मूल्यांची अनदेखी होते. काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी जनतेच्या हिताची उपेक्षा करतात.
भारतीय राजकारणात अनेकदा अहंकार आणि ईर्षा यांची उदाहरणे दिसून येतात. उदाहरणार्थ,एकाच पार्टीतील नेत्यांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळे अनेक वेळा अंतर्गत संघर्षातून फूट पडलेली दिसते किंवा गट तट पडलेले पाहिला मिळतात.(उदा. शिवसेना व राष्ट्रवादीत पडलेली फुट)

राजकीय ईर्षा आणि अहंकार हे राजकारणात अपरिहार्य असले तरी, त्यांचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. एकूणच समाजाच्या स्थैर्य आणि विकासासाठी,या दोन्ही भावनांचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक असते व आहे.

हे वास्तव हे तत्वज्ञान जाणत्या नेत्याला माहीत नसावे?

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे