माळेगाव ता,बारामती: राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व भयमुक्त व निर्भयपणे शांततेच्या वातावरणात निवडणूक पार पाडावी यासाठी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोा. पुणे यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयात दि. १६/११/२०२४ रोजी ००.०५वा. पासुन ते दि. २९/११/२०२४ रोजी १२.०० वा.पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जमाबंदीचा अंमल जारी केलेला आहे.
सदर आदेशान्वये,
कोणीही नागरीक कोणताही दाहक अथवा स्पोटक पदार्थ द्रव्य बरोबर बाळगणे,दगड, शस्त्र किंवा हवेत सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर बाळगणे,शस्त्र,सोटे,भाले,तलवारी, दंड,काठया,बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतेही वस्तु जवळ बाळगणे. कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे,किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्षन व दहन करणे. तसेच मोठयाने अर्वाच्य घोषणा देणे किंवा वाद्य वाजविणे ज्या योगेे सभ्यता अगर नितिमत्ता यांस धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, किंवा राज्य उलथवुन देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस पदार्थ तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे ज्या योगेे वरील परीसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा पध्दतीने महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणेस मनाई आहे.
५ पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, तसेच मा.पोलीस अधीक्षक सोा. पुणे ग्रामीण यांचे पुर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणेस मनाई करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलातील माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्र अंतर्गत माळेगाव बुद्रूक शहर सह इतर २३ गावातील नागरिक वरील आदेशाचे उल्लंघन करतील तर अशा नागरिकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेरा द्वारे टेहाळणी सुरू करण्यात आलेली असून त्याद्वारे विनाकारण गर्दी करणारे नागरिक, युवक यांच्या हालचाली वर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.सचिन लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे की, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, निवडणूक आयोगाच्या परवानगी कोणीही विनाकारण बेकायदा जमाव जमवू नये.

या व्यतिरिक्त आचारसंहिता कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या करीता दिनांक १५/११/२०२४ रोजी स.११.४५ वा ते दु.१२.१५. वा चे दरम्यान माळेगाव बु नगरपंचायत हद्दीत निरा- बारामती मार्गाने गोफणेवस्ती फाटा ते राजहंस चौक असा रूटमार्च घेण्यात आलेला होता

या रूट मार्चमध्ये माळेगाव पोलीस स्टेशन कडील दोन अधिकारी व २२ अंमलदार सहभागी झालेले होते.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा