श्री.रतन नवल टाटा एक सामान्य व्यक्तिमत्व त्यांच्याविषयी लिहायला गेले तर खूप काही आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,प्रत्येक घटनेवर एक वेगळी कहाणी होऊ शकते.
२८ डिसेंबर १९३७ रोजी आई सुणू आणि वडील नवल टाटांच्या पोटी मुंबईत जन्माला आलेलं हे बाळ आपल्या अद्वितीय कर्तृत्वामुळे दोनदा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले,भारतातील तसेच परदेशातील उच्च विद्यापीठांमधून सात वेळा ‘मानद डॉक्टरेट’मिळवली,
भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण आणि पद्मविभूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांनी मिळवला.
हे लिहायला जेवढे सोपे आहे ते कर्तुत्वाने मिळवणं खूप कठीण गोष्ट आहे. यासाठी एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वातल्या प्रत्येक कसोटीवर ताऊन सुलाखून निघावं लागतं तरच अशा गोष्टी शक्य असतात.
१९९१ मध्ये टाटा समूहाची जबाबदारी स्वीकारल्यापासून आपल्या नीती मूल्यांशी कायम प्रामाणिक राहून संपूर्ण जगात आपल्या कारभाराचा ठसा उमठवला सर्वात अगोदर राष्ट्रहिताला प्राधान्य, उत्पादन व सेवा यांचा दर्जा हा नेहमी सर्वोत्तम असावा हा आग्रह, कोणत्याही व्यवहारात पारदर्शकपणा यावर भर देऊन ते कार्य करणे, सहकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आचारसंहिता असावी, आपल्या सोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी, आणि सामाजिक दायित्वाचे तसेच कर्तव्याचे पालन करीत पर्यावरण विषयक नियमांना प्राधान्य देणे,यासह परोपकार आणि सामाजिक विकास या गोष्टींवर आग्रही राहणे याच आधारावर जागतिक दर्जा वरील स्टारबक्स, जग्वार, लँड रोव्हर, विदेश संचार निगम, टेलिग्लोब,ह्युज टेलिकॉम या व इतर अनेक जागतिक ब्रँडसवर आपले नाव कोरले, तसेच इंडियन हॉटेल्स, टाटा केमिकल्स, टाटा कॉफी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा टी, टाटा टेक्नॉलॉजीस, व्हिएसएनएल, या टाटा समूहाचा परदेशात मोठ्या प्रमाणावर विस्तार केला, रतन टाटा हे एक हाडाचे उद्योगपती होते मात्र त्यांनी नफ्यासाठी उद्योग न करता फक्त नफा मिळवणे हा उद्देश न ठेवता राष्ट्र उभारणीत शाश्वत विकासासाठी ते कायम वचनबद्ध राहिले. याच गोष्टी टाटांना एक “उद्योगपुरुष” होण्यास सहाय्य असाव्यात.असे माझे मत आहे.
ते खूप उदार,दानशूर व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व होते. स्वतःचा वाढदिवस आपल्या कामगारांसोबत साजरा करत त्यांच्यासह साधे भोजन करत कामगारांनी दिलेल्या भेटवस्तूंचा प्रेमाने स्वीकार करत टाटा मोटर्स पिंपरी पुणे येथील साजरा केलेला वाढदिवस कित्येकांच्या स्मरणात असेल.
भारतातील अतिउच्च उद्योगपतींच्या यादीतील आपण एक आहोत असा कोणताही अविर्भावा न ठेवता माध्यमांच्या प्रसिद्धीझोतापासून नेहमीच ते दूर रहात असत, उच्च पदावर असताना साध्या ठिकाणी राहणे, कामाच्या निमित्ताने प्रवास करत असताना दूरवरचा प्रवास असल्यास एकट्याने प्रवास करणे, कार्यालयात जाण्यासाठी साध्या मोटारींचा वापर करणे, सुट्टीच्या दिवशी सामान्य माणसासारखे निवांत समुद्रकिनारी एकांतात फिरायला जाणे आणि अगदीच निवांतक्षणी आपल्या आवडत्या कुत्र्यांसोबत वेळ व्यतीत करणे हा त्यांच्या स्वभावातला साधेपणा मनाला स्पर्श करून जातो.
रतन टाटा यांचे श्वान प्रेम सर्वश्रुत आहे, त्यांचे बॉम्बे हाऊस हे भटक्या श्वानांसाठी असे स्थान आहे जिथे टाटा समूहमार्फत भटक्या श्वानांचा सांभाळ केला जातो.
याविषयी एक घटना सांगावीशी वाटते
रतन टाटा यांना त्यांच्या जीवनात अनेक सन्मान प्राप्त झाले होते पण एका ब्रिटिश राजघराण्याच्या वतीने त्यांना २०१८ मध्ये “लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड”देण्यात येणार होता खुद्द प्रिन्स चार्ल्स हा सन्मान करणार होते व त्यांच्याच बंकिघम पॅलेस मध्ये हा कार्यक्रम होणार होता, एका उद्योगपतीने हा एका मुलाखतीत सांगितलेला किस्सा आहे वर उल्लेख केलेल्या कार्यक्रमासाठी मी लंडनमध्ये पोहोचलो विमानतळावर उतरताच पाहिले तर रतन टाटा यांचे ११ मिस्ड कॉल होते, त्यांनी लगेच रतन टाटा यांना फोन लावला, समोरून त्यांना सांगण्यात आले की, मी हा सन्मान घेण्यासाठी येऊ शकत नाही.उद्योगपती बोलले,मला माहीत होते टाटा कधीही असा निर्णय घेत नाहीत पण न राहावल्याने मी त्यांना कारण विचारले तर त्यांनी सांगितले माझ्या कुत्र्याची तब्येत ठीक नाही आणि मी त्याला अशा अवस्थेत सोडून येऊ शकत नाही ही गोष्ट जेव्हा आपली प्रिन्स चार्ल्स यांना समजली तेव्हा त्यांनी त्यांचे खुप कौतुक केले व ही एक महान व्यक्ती आहे असा उल्लेख केला.
अशा या संवेदनशील मनाच्या व्यक्तिमत्वाबद्दल मलाही कुतूहल वाटले.
त्यांच्या संवेदनशील मनाशी निगडित असलेला दुसरा प्रसंग असा..
रतन टाटा हे प्रशिक्षित पायलट होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्याच्याकडे विमान उडवण्याचा परवानाही होता.२००४ मध्ये जेव्हा त्यांचा एक कर्मचारी आजारी पडला आणि त्याला तात्काळ उपचारांची आवश्यकता होती, तेव्हा टाटा स्वतः विमान उडवण्यास तयार झाले.२००४ मध्ये पुण्यातील टाटा मोटर्सचे एमडी प्रकाश एम तेलंग यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीने मुंबईला रेफर करण्यात आले.आता पुण्याहून मुंबईला रस्त्याने जायचे तर उशीर होऊ शकला असता.अशा परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पण एमडी प्रकाश यांचे नशीब असे की घटना रविवारी घडली आणि कित्येक तास एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होऊ शकली नाही. यामुळे रतन टाटा म्हणाले,मी विमान उडवणार. सर्वांना आश्चर्य वाटले, पण टाटा एकदम तयार होते,कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्याचा जीव वाचवणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यानी स्वतःची तयारी करून आणि विमान उडवण्याचीही तयारी सुरू केली होती, पण तेवढ्यात त्यांना सांगण्यात आले की एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.या परिस्थितीत टाटांनी विमान उडवले नाही, पण त्या कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले. आपल्या सहकार्याशी आपल्या कामगारांबद्दल तर संवेदना नक्किच असावी पण मुक्या व भटक्या प्राण्यांच्या बद्दलही अतिशय हळवं मन असलेला “उद्योजक लीडर” माझ्या मनाला खुप भावला.

“माझ्या देशाचा मला अभिमान आहे हा देश जाती आणि धर्मभेदापासून मुक्त असावा व त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत इथे प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी असे राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत”
अशा महान विचारांचा वारसा असलेले रतनजी टाटा आपल्यातून जाणे हे प्रत्येक भारतीयाला गहिवरून आणणारी गोष्ट आहे ते एक यशस्वी उद्योगपती म्हणून आठवणीत राहतीलच पण त्यांच्या जीवनात ते एक व्यक्ती म्हणून त्यांचा सेवाभाव त्यांना कायमस्वरूपी अमर बनवून ठेवेल.
असं म्हणतात..
कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो,
जगात शेकडो माणसे घडत असतात
पण तुमच्या सारखा एखादाच घडतो.
देशाच्या जडणघडणीत हात असलेल्या महान उद्योजकाला,उद्योगपुरुषाला भारत सदैव स्मरणात ठेवेल.
शून्यामधुनी विश्व निर्मुनी,
किर्तीसुगंध वृक्ष फुलवुनी…
लोभ, माया, प्रीती देऊनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी…
अमर जाहला तुम्ही जीवनी…!
लोक म्हणतात की,
“एक जण गेल्याने दुनिया संपत नाही
किंवा थांबत नाही…
पण हे कोणालाच कळत नाही,
की लाख लोक मिळाले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…!

भारत देशाच्या या महान सुपुत्रास भावपूर्ण आदरांजली…..
श्री.सुशीलकुमार विलास अडागळे
मुख्य संपादक,
महाराष्ट्र पोलीस कारनामा.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा