गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
राहुरी फॅक्टरी कामगार वसाहत मध्ये घरफोडी करणारी टोळी राहुरी पोलीसांनी केली गजाआड

0
1
4
5
6
9
अ.नगर प्रतिनिधी
राहुरी: तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे आठ दिवसापूर्वी एक बंद असलेले घर फोडून अज्ञात भामट्यांनी घरातील सामान चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर घरफोडी करणाऱ्या टोळीचा राहुरी पोलिस पथकाने छडा लावला आणि आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केले.
निलेश अनिल लांडगे, वय ४१ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, आदिनाथ वसाहत, ता. राहुरी, यांचा विवाह जानेवारी २०१७ मध्ये झाला होता. त्यावेळी पत्नीच्या माहेरकडून फ्रिझ, वाॅशींग मशीन, एल.ई.डी. टी.व्ही, गॅस शेगडी अशा संसार उपयोगी वस्तू मिळाल्या होत्या. निलेश लांडगे यांनी राहुरी फॅक्टरी येथील कामगार कॉलनी येथील सिद्धार्थ प्रकाश कड यांची खोली घेऊन सर्व सामान त्या खोलीमध्ये ठेवले होते. अज्ञात भामट्यांनी त्या खोलीचा मागील दरवाजाचा कडी कोंडा तोडुन खोलीमधील सर्व सामान चोरुन नेले. सदर घटना २९ डिसेंबर २०२४ रोजी उघडकीस आली. त्यानंतर निलेश अनिल लांडगे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. १३१५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास सुरु असताना पोलिस पथकाला आरोपींचा सुगावा लागला.
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या साह्याने राहुरी येथील पोलिस पथकाने या घटनेतील आरोपी भरत गणपत गोंधळे, प्रमोद फ्रान्सिस विधाते, रोहित बाबासाहेब खंडागळे, शोएब रफिक तांबोळी, सर्व रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, यांना पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले. आरोपींकडुन चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस शिपाई अमोल भांड आदि पोलिस पथकाने केली.