
बारामती : तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे दिनांक १० मे रोजी रात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास तीन लोकांनी घरासमोर झोपलेल्या युवकास व त्याच्या आईस जबरी मारहाण केल्याची तक्रार वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निखिल पोपट लकडे रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ते त्यांच्या आई व भाऊ यांच्यासह घरी रात्री झोपेत असताना तीन लोकांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला.
फिर्यादी हे घराच्या बाहेरील बाजूस झोपलेले असताना हल्लेखोरांनी फिर्यादीचे पाय दाबून धरून ठेवून डोक्यावर लाकडी काठीने मारहाण केली बाहेर आवाज आल्याने फिर्यादीचे भाऊ विक्रांत लकडे व आई स्वाती लकडे बाहेर येऊन पहात असताना हल्लेखोरांनी फिर्यादी यांची आई स्वाती लकडे यांना पोटात लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे भाऊ विक्रांत लकडे याने हस्तक्षेप केला असता हल्लेखोरांपैकी एक जण बोलला “मी पोलीस आहे, तुला खल्लास करून टाकीन” असे म्हणत धमकी दिली तर सोबतच्या अजून एकाने शिवीगाळ करत दमदाटी केली.घडत असलेल्या प्रसंगांचे गांभीर्य ओळखून फिर्यादी यांचे भाऊ विक्रांत याने तत्काळ ११२ वर संपर्क करून पोलीसांना बोलावले.पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले व वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र चौकीत नेले. तेथे आरोपींची चौकशी करून त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवले तसेच फिर्यादी व त्यांच्या आई यांना वैद्यकीय उपचारांसाठी बारामती येथे सरकारी रुग्णालयात पाठवले.घटनेदरम्यान तिघेही हल्लेखोर दारूच्या नशेत होते अशी माहिती समोर आली आहे.घटनेची सविस्तर माहिती घेवून हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हल्लेखोरांमध्ये प्रमोद धनसिंग क्षिरसागर(पोलीस हवालदार, नेमणूक लोणंद पोलीस स्टेशन जिल्हा सातारा), सुरज मारुती आडके, आणि अविनाश पांडुरंग सरगर हे सर्व रा.धुळदेव भिवरकरवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील आहेत.
चौकशीदरम्यान असेही स्पष्ट झाले आहे की प्रमोद क्षिरसागर( (पोलीस हवालदार, नेमणूक लोणंद पोलीस स्टेशन जिल्हा सातारा)हा विक्रांत लकडे (फिर्यादीचे भाऊ) यांच्या पतीपत्नीच्या प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी आला होता,अशी माहिती आरोपींनीच दिली असल्याचे समजत आहे.
आरोपी हे चारचाकी वाहन क्रमांक MH 11 BH 5465 घेऊन आले होते.

हा संपूर्ण प्रकार करंजेपुल पोलीस दूर क्षेत्रात घडला आहे. फिर्यादी यांनी समक्ष भेटून हा सर्व प्रकार पोलीसांना संगीतला आहे.
घटनेतील संबंधित पो.हवलदार एका माजी खासदारचा अंगरक्षक आहे अशीही माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान साहेबांना सांगून तुझ्याकडे बघतो अशी धमकी देखील तो देत होता.चौकशी दरम्यान त्या मुजोर पो.हवालदाराने स्थानिक पोलीसांना देखील उलटसुलट बोलल्याची चर्चा आहे.
सदर प्रकरणाचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे तसेच करंजेपूल दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनात स.फौ. दिपक वारूळे हे करत आहेत.
दरम्यान फिर्यादीने आरोपींची तपासपूर्ण चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस हवलदारावर व त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंद झाला आहे. घटनेत एका मुजोर पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने मोठी खळबळ माजली आहे.

सदर घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या अंगावरील वर्दीचा,पदाचा तसेच अधिकाराचा गैरवापर केला आहे. अशा वर्दीचा माज असणाऱ्या विकृत पोलीस कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे व अशाच काही चुकिच्या लोकांमुळे कर्तव्यदक्ष पोलिसांची मान शरमेने खाली जात आहे.
सातारचे पोलिस अधीक्षक,पोलीस हवालदार प्रमोद क्षिरसागर (पोलीस हवालदार, नेमणूक लोणंद पोलीस स्टेशन जिल्हा सातारा) विरुद्ध काय कारवाई करणार? कि एका माजी खासदाराचा अंगरक्षक असल्याने कारवाई टाळली जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा