ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
अजितदादांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेला ‘नो एन्ट्री’? बारामतीच्या उमेदवार यादीतून मित्रपक्ष गायब! महायुतीचा धर्म फक्त भाजपसाठी?

0
4
7
3
2
9
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची संभाव्य उमेदवारी यादी जाहीर झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या यादीने महायुतीतील ‘सबका साथ’ या नाऱ्यालाच हरताळ फासल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अजितदादांनी आपल्या यादीत भाजपला सामावून घेतले असले तरी, राज्याच्या सत्तेत खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र बारामतीच्या वेशीवरच रोखल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील काही दिवसांपासून अजित पवार स्वतः बारामतीत ठाण मांडून होते. स्थानिक पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी मॅराथॉन बैठका घेतल्या. या खलबतांनंतर जी संभाव्य यादी समोर येत आहे, त्यामध्ये अजित पवारांनी अतिशय सावध आणि सोयीची रणनीती आखल्याचे दिसते. या उमेदवार यादीत राष्ट्रवादीसोबतच भाजपच्या काही उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, महायुतीतील तिसरा आणि महत्त्वाचा भिडू असलेल्या शिवसेनेचा (शिंदे गट) या प्रक्रियेत कोणताही विचार करण्यात आलेला नाही.
बारामतीत महायुती म्हणून भाजपला सन्मानाने वागणूक मिळते, त्यांना सत्तेत वाटा मिळतो, मग त्याच महायुतीचा भाग असलेल्या शिवसेनेला सापत्न वागणूक का? असा संतप्त सवाल आता स्थानिक शिवसैनिकांमधून उपस्थित होत आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या संभाव्य यादीत शिवसेनेला साधा विचारलेही गेले नसल्याने, “बारामतीत दादा शिवसेनेला जुमानतच नाहीत,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे. वरिष्ठांच्या पातळीवर युती असली तरी, स्थानिक पातळीवर मात्र अजित पवार शिवसेनेला महत्त्व देत नसल्याचा सूर उमटत आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि भाजपला सामावून घेत एक वेगळेच राजकीय गणित मांडल्याचे बोलले जात आहे. मात्र, यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विचार न झाल्याने बारामती तालुक्यात महायुतीचे भवितव्य काय असेल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपला सोबत घ्यायचे, पण शिवसेनेला दूर ठेवायचे, ही रणनीती भविष्यात महायुतीत दुफळी निर्माण करणारी ठरू शकते.
एकंदरीत, बारामतीत “दादा म्हणतील तीच पूर्व दिशा” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, शिवसेनेला जाणीवपूर्वक बाजूला सारले जात असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे.




