
माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी व देशी दारूधंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाशी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे दारू विक्रेते मुजोर झाले असून, नागरिकांनी केलेल्या विरोधाला न जुमानता राजरोसपणे हे धंदे सुरू असल्याचे विदारक चित्र परिसरात पाहायला मिळत होते. या वाढत्या आरोपांची दखल घेत माळेगाव पोलिसांनी मागील दोन दिवसांत तातडीने पावले उचलत एकापाठोपाठ एक अशा पाच धडक कारवाया केल्या आहेत. मात्र, या सर्व कारवायांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल इतका तुटपुंजा आहे की, यामुळे पोलिसांच्या या कारवाईच्या मूळ हेतूवर आणि विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माळेगाव पोलिसांनी २९ आणि ३० मे २०२६ रोजी केलेल्या कारवायांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:
१. जळगाव कप येथे कारवाई (गु.र.नं १३६/२०२६)
दिनांक २९ मे रोजी सायंकाळी जळगाव कप येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी नितीन निवृत्ती खोमणे याला त्याच्या घराजवळ बेकायदा दारू विक्री करताना पकडण्यात आले. मात्र, पोलिसांना या कारवाईत केवळ ४४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ११ बाटल्या जप्त करण्यात यश आले आहे.
२. खांडज येथे छापा (गु.र.नं १३७/२०२६)
दुसरी कारवाई २९ मे रोजी खांडज गावच्या हद्दीत करण्यात आली. आरोपी सुग्रीव अंकुश भंडलकर (वय ३२) याला घराच्या पाठीमागे दारू विकताना रंगेहात पकडण्यात आले. या आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तरीही पोलिसांना त्याच्याकडून केवळ ५२० रुपये किमतीच्या १३ बाटल्याच हस्तगत करता आल्या.
३. निरावागजमध्ये कारवाई (गु.र.नं १३८/२०२६)
दिनांक ३० मे रोजी दुपारी निरावागज हद्दीत केलेल्या कारवाईत आरोपी सागर बाळासो भंडलकर (वय २६) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ६०० रुपये किमतीच्या १५ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, या आरोपीचाही पूर्व इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा आहे.
४. माळेगाव बुद्रुक येथे महिलेवर गुन्हा (गु.र.नं १३९/२०२६)
३० मे रोजी सायंकाळी माळेगाव बुद्रुक येथील झैलसिंग रोड परिसरात पोलिसांनी छापा मारून सुरेखा वसंत माने (वय ५०) या महिलेवर कारवाई केली. घराच्या आडोशाला चोरून दारू विक्री करणाऱ्या या महिलेकडून केवळ ६०० रुपये किमतीच्या १५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
५. पणदरे-अशोकनगर येथील कारवाई (गु.र.नं १४०/२०२६)
३० मे रोजीच संध्याकाळी पणदरे येथील अशोकनगरमध्ये निरा डावा कॅनॉललगतच्या उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. येथे आरोपी राजेंद्र सत्तु राखपसरे (वय ५०) याच्याकडून ५२० रुपये किमतीच्या १३ बाटल्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी धडक मोहीम राबवून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवायांचा सपाटा लावला असला तरी, या प्रत्येक कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल केवळ ४०० ते ६०० रुपयांच्या घरात आहे. परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या अवैध धंद्यांमध्ये केवळ काही रुपयांचा मुद्देमाल सापडणे ही अत्यंत न पटणारी बाब आहे.
पोलिसांची ही कारवाई खरोखरच दारूबंदीसाठी आहे की नागरिकांच्या आरोपांवर पांघरूण घालण्यासाठी केलेली ही केवळ ‘तात्पुरती मलमपट्टी’ आहे? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. अशा किरकोळ कारवाया करून मुजोर दारूमाफियांवर वचक बसणार नाही. यावर पोलीस प्रशासन भविष्यात काही ठोस उपाययोजना करणार की अशाच संशयास्पद आणि नाममात्र कारवायांचा ‘फार्स’ सुरू राहणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा