Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

“मला दोन पेटी द्या…” ‘बी.के. ग्रुप’ची धमकी आणि भरवस्तीत गोळीबार; बारामतीत व्यावसायिकावरील हल्ल्याने खळबळ!

1 0 2 5 3 1

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरून दोन लाख रुपयांची (दोन पेटी) खंडणी मागून ती देण्यास नकार दिल्याच्या रागातून, अज्ञात हल्लेखोरांनी थेट बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या आलिशान ‘डिफेंडर’ गाडीवर गोळीबार केल्याचा थरारक प्रकार घडला आहे. शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सूर्यनगरी परिसरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण बारामती शहर हादरून गेले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरी येथील महादेव मंदिराजवळ ‘अन्याय व्हिला’ येथे बांधकाम व्यावसायिक राजन धनंजय कोळेकर हे वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास कोळेकर यांना ‘बी. के. ग्रुप’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक कॉल आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने “मी बी.के. बोलतोय, तुम्ही सगळ्यांना पैसे देता, मला दोन पेटी (दोन लाख रुपये) द्या,” अशी थेट खंडणीची मागणी केली. मात्र, कोळेकर यांनी “मी कोणालाही पैसे दिले नाहीत आणि तुम्हालाही पैसे देणार नाही,” असे ठामपणे सांगताच, समोरील व्यक्तीने “ठीक आहे, ठेव फोन” असे म्हणत फोन कट केला.

हा धमकीचा कॉल येऊन अवघे दोन तास उलटत नाहीत तोच, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोळेकर यांच्या घराबाहेर मोटारसायकल जोरात रेस केल्याचा आवाज आला. नेमके कोण रेस करत आहे, हे पाहण्यासाठी कोळेकर यांनी तात्काळ घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी समोर जे दृश्य दिसले, त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांपैकी एकाने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कोळेकर यांच्या आलिशान डिफेंडर (MH42BY7474) गाडीवर गोळीबार केला आणि तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. सुदैवाने, गोळीबार झाला त्यावेळी गाडीमध्ये किंवा पार्किंग परिसरात कोळेकर यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

या घटनेची माहिती कोळेकर यांनी तात्काळ पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांच्या पाहणीत गाडीच्या मागील बाजूच्या पत्र्यावर गोळी लागल्याचे स्पष्ट निशान आढळून आले असून, खाली पडलेला गोळीचा पुढील भाग आणि रस्त्यावर एक रिकामे काडतूसही सापडले आहे. घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यासाठी न्यायवैज्ञानिक पथकालाही (FSL) पाचारण करण्यात आले आहे.
राजन कोळेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोटारसायकलवरील त्या तिन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याची दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) एक पथक तातडीने रवाना करण्यात आले आहे.

खंडणीची मागणी करणारा ‘बी.के.’ आणि गोळीबार करणारे हल्लेखोर एकच आहेत का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजे १८ ऑक्टोबर रोजी बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्या प्रकरणाची चर्चा अद्याप शमलेली नसतानाच, आता भरवस्तीत दुसऱ्या एका व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार झाल्याने बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे