Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती: ‘आरोग्यवारी अल्ट्रा रन – २०२६’ मॅरेथॉननिमित्त वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे पोलिसांचे आवाहन

0 7 9 5 2 4

लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रविवार, दिनांक २६ जुलै २०२६ रोजी ‘आरोग्यवारी अल्ट्रा रन – २०२६’ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने धावपटू आणि नागरिक सहभागी होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुणे जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये पुणे ते बारामती आणि बारामती शहर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

सदर मॅरेथॉन स्पर्धा रविवारी पहाटे ०३.३० वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून मार्गस्थ होईल. वडकीनाला, दिवेघाट, सासवड, जेजुरी, मोरगाव आणि सुपा या मार्गावरून मार्गक्रमण करत ही स्पर्धा बारामती शहरात प्रवेश करेल. बारामती येथील नटराज नाट्यकला मंदिर येथे स्पर्धेची सांगता होणार असून सायंकाळी ०५.०० ते ०६.०० या वेळेत बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर जेजुरी मार्गे बारामती किंवा केंजळगाव चौफुल्याकडे जाणारी वाहतूक जेजुरी, बेलसर फाटा, पारगाव, मेणगाव, सुपा मार्गे वळविण्यात आली आहे. पहाटे ०४.०० ते दुपारी १२.०० या वेळेत वाघापूर किंवा पारगाव मार्गे सातारा दिशेने जाणारी सर्व वाहने वाघापूर, पारगाव, पिसुर्टी, सुपा, लोणी भापकर, कोरेगाव, सांगवी आणि फलटण मार्गे वळविण्यात येतील. तसेच, सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक सासवड, बेलसर फाटा, जेजुरी, सुपा, उंडवडी मार्गे, तर बारामतीकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक उंडवडी, सुपा आणि सासवड मार्गे पाठविली जाणार आहे. निरा गावाकडून येणारी वाहतूक सुपा, पाटस मार्गे सोलापूर महामार्गाकडे वळविण्यात येईल.
बारामती शहरात रविवारी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत किंवा स्पर्धा पूर्ण होईपर्यंत मॅरेथॉन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. शहरात विराट हॉटेल, खंडोबानगर, कसबा, गुणवडी रोड, कुडगाव चौक, निमगाव चौक आणि निरा रोड असा सुमारे पाच किलोमीटरचा टप्पा स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे. परिणामी, बारामती शहरातून निमगावकडे जाणारी वाहतूक फलटण चौक, शिरस रोड, माळवाडी देवी, कोर्ट कॉर्नर मार्गे वळविण्यात येईल. तीन हत्ती चौक ते सय्यद चौक हा मुख्य मार्ग दोन्ही बाजूंनी पूर्णतः बंद राहणार असून, येथील स्थानिक रहिवाशांनी सर्व्हिस रोडचा वापर करणे बंधनकारक राहील. पाटस रोडकडून येणारी वाहतूक रेल्वे रुळालगतच्या मार्गाने मेहता हॉस्पिटल, महिला हॉस्पिटल मार्गे एमआयडीसीकडे वळविण्यात येणार आहे.
पुणे बाजूकडून निमगावकडे जाणारी वाहतूक महात्मा फुले चौकातून कसबा गणेशकडे न पाठविता महात्मा फुले चौक, देशमुख चौक, सातव चौक, रेल्वे ओव्हरब्रिज, मेडिक्लिन हॉस्पिटल मार्गे पुढे वळविण्यात येणार आहे.
स्पर्धेदरम्यान वाहतूक नियमन आणि सुरक्षिततेसाठी शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी, होमगार्ड व स्वयंसेवकांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय आणि १०८ रुग्णवाहिका सेवेशी समन्वय प्रस्थापित करण्यात आला आहे.

सर्व नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्गाने प्रवासाचे पूर्व नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. मॅरेथॉन मार्गावर अनावश्यक वाहने आणू नयेत. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना प्राधान्याने रस्ता मोकळा करून द्यावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वाहतूक पोलीस व प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे