Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

‘सोमेश्वर’ कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर; शेतकऱ्यांच्या हितासाठी आ.विजय (बापू) शिवतारेंच्या नेतृत्वाखाली देणार सक्षम पॅनेल

0 8 6 9 9 9

पुरंदर : पुरंदर-हवेलीच्या राजकारणाचा कणा असलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा शिवसेना स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढवणार आहे. आमदार विजय (बापू) शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचा निर्धार मंगळवारी (ता. १) करण्यात आला. शिवतारे यांच्या पुरंदरेश्वर या निवासस्थानी आगामी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये निवडणुकीची दिशा आणि रणनीती निश्चित करण्यात आली.

या बैठकीनंतर बोलताना ॲड. राजेंद्र काळे यांनी स्पष्ट केले की, आदरणीय शिवतारे बापूंच्या नेतृत्वाखाली शिवसेना व इतर सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन सोमेश्वर कारखान्यासाठी एक सक्षम पॅनेल दिले जाईल. या निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक गावात लवकरच बैठकांना सुरुवात होणार असून, ‘घोंगडी बैठकां’च्या माध्यमातून प्रत्येक गटातील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष डॉ. वसंतराव दगडे यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “शेतकऱ्यांना उसाचा योग्य भाव मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.” आ. विजय शिवतारे यांना स्वतःचा साखर कारखाना उभारण्याचा आणि चालवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनुभवाचा फायदा घेत सोमेश्वर कारखाना अधिक उत्तम आणि पारदर्शक पद्धतीने चालवला जाईल. साखरेचे दर आणि कारखान्यातील मोलासेससारख्या उपपदार्थांचा १००% योग्य वापर करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळले जाईल, असा विश्वास डॉ. दगडे यांनी व्यक्त केला.

डॉ. दगडे यांनी निदर्शनास आणून दिले की, सोमेश्वर कारखान्याचे पुरंदरमध्ये सुमारे ९,००० तर बारामतीमध्ये १६,००० सभासद आहेत. पुरंदरमधील या ९,००० सभासदांचे हित जपण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून ही निवडणूक लढवणार आहोत. अजित दादांच्या निर्णयानंतर कारखान्याची कोणतीही हानी न होता तो उत्तम चालावा, अशीच सर्व शिवसैनिकांची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला विभागवार आणि गटवार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा समावेश होता:

​प्रमुख पदाधिकारी: जिल्हाप्रमुख अतुल मस्के, तालुकाप्रमुख उमेश गायकवाड, उपसभापती प्रवीण जगताप, सहकार समन्वयक महेश जेधे आणि डॉ. वसंतराव दगडे.

​पुरंदरमधील इतर उपस्थिती: समीर जाधव, माऊली धुमाळ, दत्ता धुमाळ, सतीश साळुंखे, सुशील चव्हाण, नीलेश चिकणे, अरुण कापरे, अरविंद जेधे, करणवाडीचे सरपंच किसन महानवर, स्वागत निगडे, प्रशांत रासकर.

​बारामती विभागातील उपस्थिती: ॲड. राजेंद्र काळे, स्वप्नील जगताप, नीलेश मदने, विश्वास मांढरे,अविनाश शिंदे, बाळासाहेब कदम, नितीन गायकवाड, अविनाश कदम, राजेंद्र साळुंखे बंटी गायकवाड आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

​श्रावण महिन्यातील या शुभ दिवशी कारखाना आणि शेतकरी बंधूंचा संसार व्यवस्थित चालावा, अशी सोमेश्वर चरणी प्रार्थना करून या बैठकीची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे