गुन्हेगारीब्रेकिंग
बारामती एमआयडीसीत चाकूच्या धाकाने लुटमार; दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त!

0
3
9
4
5
7
बारामती : बारामती एमआयडीसी परिसरातील निर्जन रस्त्यांचा फायदा घेत वाहनचालकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांवर बारामती तालुका पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. चाकूचा धाक दाखवून एका स्कुटीस्वारास लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत लावलेल्या या तपासाने बारामती तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
थरारक घटनाक्रम: भररस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी
सदर घटना बारामती एमआयडीसी परिसरातील वंजारवाडी ब्रिजजवळ घडली होती. फिर्यादी आपल्या स्कुटीवरून प्रवास करत असताना, लिंबाच्या झाडाशेजारी दबा धरून असलेल्या किंवा पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना गाठले. आरोपींनी फिल्मी स्टाईलने आपली मोटारसायकल फिर्यादीच्या गाडीसमोर आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले.
काही समजण्याच्या आतच आरोपींनी धारदार चाकूचा धाक दाखवत, “आवाज केला तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिली. या वेळी दहशतीखाली असलेल्या फिर्यादीच्या हातातील ३८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि ३ ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून घेत आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला.
पोलिसांची ‘मास्टर स्ट्रोक’ कामगिरी
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास पथके रवाना केली. एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणासह गुप्त बातमीदारांचे नेटवर्क कामाला लावले. खबऱ्यामार्फत मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार (दोघेही राहणार बारामती) या दोघांची ओळख पटवली. पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले.
चोरीचे सोने विकून मिळवलेली रोकडही जप्त
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपींकडून लुटलेले काही सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांनी यातील काही दागिने विकले होते. पोलिसांनी त्या विक्रीतून आलेली १ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दक्ष पोलीस पथक
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील या धडक कारवाईत पो.उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, धनश्री भगत, ग्रेड पो.उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, तसेच पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार आणि दादा दराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बारामती एमआयडीसी परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी आरोपींना जेरबंद केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.







