बारामती: पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हद्दीत बंद पडलेल्या ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळील निर्जन स्थळी एक महिला व दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत महिला वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, मुलगा वय 3 ते 4 वर्षे, दुसरा मुलगा वय 1 ते 2 वर्ष असे मृत अवस्थेत आढळले आहेत. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे
सदर घटना 25 मे 2025 रोजी सकाळच्या वेळी घडलेली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान श्वानपथकामार्फत हल्लेखोरांचा शोध घेतला जात असल्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सांगण्यात आले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस व गनिरीक्षक सविता काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
महिलेच्या ओळखीकरिता काही विशेष गोंदण चिन्हे निदर्शनास आली आहेत. उजव्या हाताच्या मनगटावर ‘Mom Dad’ आणि बदाम चिन्ह, पाठीमागील बाजूस ‘R, S, Rajratan’ आणि ‘जय भीम’ असा मजकूर गोंदलेला होता. डाव्या हातावर फुलांची डिझाईन होती.
घडलेला प्रकार हा केवळ हत्या नव्हे तर आरोपीने अत्यंत क्रुरपणे हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे.

संदिप सिंह गिल यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस पाहणी करताना घटनास्थळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सध्या अज्ञात आहे. गुन्हा भारतीय दंड विधान कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, तसेच प्रभारी अधिकारी म्हणून श्री. वाघमोडे हे करत आहेत.

घटनेची गंभीरता लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, स्थानीय गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि रांजणगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
याशिवाय फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, आणि फिंगरप्रिंट एक्स्पर्ट्स यांनी सुद्धा घटनास्थळाचा सखोल तपास केला आहे.

सध्या मयत महिला व मुलांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु असून, विविध तपास पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणी या महिलेची किंवा मुलांची ओळख पटवू शकत असेल, तर कृपया रांजणगाव पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा.

या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्या हादरून गेला आहे. पोलिसांची तपासाची गती, फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत आणि लोकसहभागातून या गुन्ह्याचे गूढ लवकर उकलले जावे,अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा