Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणसामाजिक

वडगाव निंबाळकरमध्ये कचरा आणि बेकायदेशीर वराह पालनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

1 0 2 0 3 7

बारामती: वडगाव निंबाळकर परिसरातील स्मशानभूमीच्या भागात सध्या घाणीचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन गाड्यांमधील कर्मचारी लोकवस्तीशी संबंधित असलेल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हातपंपाशेजारीच हा कचरा टाकत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

 

याशिवाय जवळच असलेल्या स्मशानभूमीच्या मागच्या बाजूला हा सर्व कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याऐवजी तो थेट जाळला जात आहे. या कचऱ्याच्या धुराचा वडगाव निंबाळकर ते कोराळे या रस्त्याच्या पूर्वेकडील नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, हवेची दिशा बदलल्यास स्मशानभूमीच्या अलीकडच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाशांनाही या धुराचा आणि घाणीचा मोठा फटका बसत आहे.

या कचऱ्याच्या समस्येसोबतच या परिसरात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. या भागात शेळीपालनासाठी प्रशासनाची परवानगी घेतल्याचे सांगून प्रत्यक्षात त्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या वराह पालन (डुक्कर फार्म) चालवले जात असल्याची माहिती मिळत आहे. या वराह पालनासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे की नाही, हा तपासाचा विषय असला तरी या दुर्गंधीमुळे ओढ्याच्या अलीकडील लोकांना भयंकर आरोग्यविषयक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

मरी माता नगरमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याची कोणालाही चिंता राहिलेली नाही, अशी हतबलता स्थानिक व्यक्त करत आहेत. आधीच कचरा डेपोचा त्रास आणि आता त्यात सुरू झालेले वराह पालन यामुळे आमचे जीवन रामभरोसे झाले असून, आमचा कोणीही वाली राहिलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.
सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक राजवट लागू असल्याने स्थानिक पातळीवर जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही. याचाच गैरफायदा घेत या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने लोकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर या कचरा डेपो आणि बेकायदेशीर वराह पालनाच्या शेडवर योग्य ती कडक कारवाई केली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात या भागात मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांसोबतच महाराष्ट्र पोलीस कारनामा MPK NEWS या गोष्टीचा पाठपुरावा करत राहिल

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे