Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

लोणी भापकरमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; चौघांवर खुनाच्या प्रयत्नासह अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

0 7 9 9 8 2

बारामती : तालुक्यातील लोणी भापकर येथे एका तरुणावर कोयत्याने मानेवर आणि डोक्यावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चार जणांवर खुनाच्या प्रयत्नासह अट्रॉसिटी आणि हत्यार कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रथमेश उर्फ सोन्या जालिंदर कांबळे (वय २८, रा. लोणी भापकर, ता. बारामती) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अभिषेक तात्या पवार, प्रथमेश जालिंदर खोमणे, महेश भापकर आणि ओंकार उर्फ सोनू राजेश आरडे (सर्व रा. लोणी भापकर, ता. बारामती) या चारही जणांवर भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास लोणी भापकर परिसरातील बोरघाट येथील सोन्या आरडे यांच्या पोल्ट्रीवर हा प्रकार घडला. एका किरकोळ कारणावरून या चारही आरोपींनी संगनमत करून प्रथमेश कांबळे याच्यावर लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले.

या घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल खेडकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. दाखल झालेल्या या गुन्ह्याचा अहवाल बारामती येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाला रवाना करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम हे करत आहेत. या घटनेमुळे लोणी भापकर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे