Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिकसोशल मिडिया

समाजात वावरताना एक ‘चांगला माणूस’ म्हणून आपली प्रतिमा निर्माण करा. चांगला माणूस बनण्याची सुरुवात वर्गातूनच होते. श्री.विश्वजित घोडके, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सातारा गुन्हे शाखा

सोशल मीडियापासून शाळकरी विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर ठेवावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे आवाहन

0 8 9 3 8 4

वडगाव निंबाळकर : आजच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण पिढीचे भवितव्य हरवत चालले असून ते चुकीच्या दिशेने भरकटत आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर केवळ आवश्यकतेपुरताच करावा आणि त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे, असा अत्यंत मोलाचा सल्ला सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विद्यार्थ्यांना दिला. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

​या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घोडके साहेबांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचे वाढते धोके स्पष्ट करताना ते म्हणाले की, सध्या समाजात घडणारे सर्वाधिक गुन्हे हे याच सोशल मीडिया माध्यमांद्वारे घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळीच सावध होऊन या आभासी जगापासून दूर राहणे त्यांच्या हिताचे आहे.

​शालेय जीवनातील शिक्षकांची शिक्षा आणि त्याचा भविष्यावर होणारा सकारात्मक परिणाम उलगडताना त्यांनी मंचावर उपस्थित असलेले लोणंदचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे साहेब यांच्या उदाहरणाचा संदर्भ दिला. शाळेत असताना पाठीवर काळी वळ उमटेपर्यंत शिक्षकांचा मार खाल्ल्यामुळेच ते आज अधिकारी बनू शकले. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा मार खाऊन त्यातून योग्य धडा घेतला, ते आज समाजावर अधिकार गाजवत आहेत. याउलट, ज्यांनी या शिक्षेतून काहीही बोध घेतला नाही, ते आज समाजात नतद्रष्ट म्हणून वावरत आहेत आणि इतरांच्या पाठीवर वळ उठवण्याचे म्हणजेच समाजाला त्रास देण्याचे काम करत आहेत. शिक्षकांनी दिलेल्या प्रत्येक शिक्षेचा आणि ओरडण्याचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर नेहमीच चांगला परिणाम होतो, ही बाब त्यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणासह पटवून दिली.

​अधिकारी पदापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्वतःच्या अंगी स्वयंशिस्त बाळगणे गरजेचे असल्याचे घोडके यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थी भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनणार नाहीत, काही जण सामाजिक, राजकीय तर काही व्यावसायिक क्षेत्रात जातील. परंतु, कोणत्याही क्षेत्रात गेले तरी समाजात वावरताना आपली एक ‘चांगला माणूस’ म्हणून प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्वांनी आजपासूनच प्रयत्न केले पाहिजेत. चांगला माणूस बनण्याची ही सुरुवात आपल्या वर्गातूनच होते. मित्राला अभ्यासात मदत करणे, वर्गात स्वच्छता ठेवणे आणि शिक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे, या छोट्या सवयींमधूनच एक उत्तम व्यक्ती घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

​आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना घोडके साहेब जुन्या आठवणींत रमले. २००८ मध्ये पोलीस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर याच शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला होता. आज तब्बल १८-१९ वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेत येण्याची आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत, शाळेला कधीही आवश्यकता भासल्यास आपण शक्य ती सर्व मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

​याच कार्यक्रमात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांनीही उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांसमोर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शाळेचे माजी विद्यार्थी हेच सध्याच्या विद्यार्थ्यांचे खरे आदर्श असतात.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले विश्वजित घोडके सर आणि शिवाजी जायपत्रे साहेब हे याच शाळेचे माजी विद्यार्थी असून आज ते उच्च पदस्थ अधिकारी आहेत. त्यांनी याच शाळेतून शिक्षण घेऊन हे मोठे यश मिळवले असल्याने ते विद्यार्थ्यांच्या समोर एक मोठे आदर्श (आयडॉल) आहेत.

​विद्यार्थ्यांनी या संबंधित अधिकारी व गुरुजनांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि त्यांच्या यशोगाथेपासून प्रेरणा घेऊन स्वतःला त्या मार्गावर पेटवून उठवले पाहिजे, असे आवाहन मोहिते यांनी केले. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी केवळ एक चांगला अधिकारीच नव्हे, तर एक उत्तम आणि गुणी व्यक्ती बनण्याचे ध्येय ठेवून आपल्या भविष्याची वाटचाल ठरवली पाहिजे. जायपत्रे साहेबांनी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणी ज्या सुंदर आणि तन्मयतेने शेअर केल्या, त्या आठवणींचा उजाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यातून सर्वांनी प्रोत्साहन घेतले पाहिजे, असे मोहिते म्हणाले. शेवटी त्यांनी सर्व शालेय विद्यार्थी मित्रांना त्यांच्या आगामी उज्ज्वल भविष्याबद्दल आणि वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे