Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती पोलिसांची मोठी कारवाई: ३४ लाखांचा गंडा घालणारा ‘चतुर’ मॅनेजर जेरबंद!

सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या; हॉटेल व्यवसायात केला होता मोठा अपहार.

0 6 0 2 3 8

बारामती : विश्वासघात आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. हॉटेल व्यवसायात व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून काम करताना तब्बल ३४ लाख ३३ हजार ३९३ रुपयांचा अपहार करून सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती) याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

आरोपी दत्तात्रय खुळे हा एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याने मालकाचा विश्वास संपादन केला आणि त्याचाच फायदा घेत आर्थिक गैरव्यवहार सुरू केले. ग्राहकांची बनावट नावे नोंदवणे, बिलांची उधारी दाखवणे आणि हिशोबात फेरफार करून त्याने एकूण ३४.३३ लाख रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. मात्र, बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय केले होते. आरोपीचा ठावठिकाणा मिळताच पोलीस पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

 

ही धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत, सहायक फौजदार संदीप जाधव, हवालदार रामचंद्र शिंदे आणि पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांचा समावेश होता.

 पोलिसांचे आवाहन

“गुन्हेगार कितीही चतुर असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही,” असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे