ब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत नीरा डावा कालव्यात आढळला अनोळखी मृतदेह; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

0
9
1
0
2
8
बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांदलवाडी येथील नीरा डावा कालव्यात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह पाण्यातून वाहून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचे वय अंदाजे २८ ते ३० वर्षे असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून नागरिकांना या तरुणाची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १९४ अन्वये (अकस्मात मयत रजि. नं. ८४/२०२६) नोंद करण्यात आली आहे. पुढील वैद्यकीय कार्यवाही आणि ओळख पटवण्याच्या उद्देशाने मृतदेह सध्या बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.

मयत तरुणाचे वर्णन
मयत तरुणाचे वय अंदाजे २८ ते ३० वर्षे आहे. त्याच्या अंगात फुल बाह्यांचा पांढऱ्या रंगाचा शर्ट असून, आत भगव्या रंगाचे बनियान आहे. या बनियानावर त्रिशूळ आणि ‘ॐ’ असे चित्र छापलेले आहे. कमरेला फिकट निळ्या रंगाची जीन्स पँट आणि आतील वस्त्र मॅक्रोमन कंपनीचे आहे. तसेच त्याच्या गळ्यात पांढऱ्या रंगाची साखळी (चेन) घातलेली दिसून आली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वरील वर्णनावरून या मयत तरुणाची ओळख पटत असल्यास, त्याचे नाव, पत्ता किंवा तो बेपत्ता असल्याची कोणालाही कोणतीही माहिती असल्यास तात्काळ बारामती शहर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांनी ही माहिती परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करून नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांनी केले आहे.
माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक:
बारामती शहर पोलीस स्टेशन : 9552069100
पोलीस निरीक्षक श्री. चिवडशेट्टी : 8108222068
पोलीस हवालदार खाडे : 9881327661



