गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर बारामती पोलिसांची करडी नजर, सतर्क पोलीस, सुरक्षित बारामती. दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

0
8
8
1
0
7
बारामती : बारामती शहर पोलिसांनी वेगवेगळ्या दोन धडक कारवाया करत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये स्वतःच्या सावत्र बहिणीच्या घराला आग लावून पसार झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि दुसऱ्या एका कारवाईत, गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात तब्बल पाच वर्षे न्यायालयाला गुंगारा देणारा वॉरंटधारक आरोपी अशा दोघांनाही पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या दोन्ही आरोपींची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.
पहिल्या घटनेत, सावत्र बहिणीच्या घराला आग लावल्याच्या गंभीर प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी राकेश उर्फ बिट्या गणेश गायकवाड याला पहाटेच्या वेळी अत्यंत गोपनीय सापळा रचून त्याच्या राहत्या घरातून अटक केली. घरालाच आग लावल्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार होता. या आरोपीवर यापूर्वीही जबरी चोरी, खंडणी, मारहाण आणि अॅट्रॉसिटीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्याविरुद्ध अनेक वॉरंट्सही प्रलंबित होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया पाहता, भविष्यात त्याच्याकडून आणखी गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांकडून त्याच्यावर आता एमपीडीए (MPDA) किंवा इतर कडक कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी कायदेशीर छाननी सुरू आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, २०२१ मधील एका मारहाणीच्या गुन्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला टाळाटाळ करणाऱ्या देवेंद्र रामचंद्र घोडके याला पोलिसांनी कसबा भागातून अटक केली. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी रस्त्यावरील लोखंडी रॅक बाजूला करण्याच्या किरकोळ वादातून या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात थेट कुकर मारून त्यांना जखमी केले होते. तसेच अंगावर लोखंडी कोयता घेऊन धावून जाण्याचा धक्कादायक प्रकारही घडला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी न्यायालयात हजर राहत नव्हता. वारंवार समन्स आणि वॉरंट काढूनही तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला कसबा परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
या दोन्ही कारवायांमधून बारामती शहर पोलिसांनी गुन्हेगारांना अत्यंत स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे की, हिंसक कृत्ये करून किंवा न्यायालयाचे समन्स आणि वॉरंट टाळून कायद्याच्या कचाट्यातून कोणालाही सुटता येणार नाही. वॉरंट जुने झाले म्हणून ते संपत नाही आणि न्यायालयाचा आदेश बजावला जाईपर्यंत पोलिसांचा शोध थांबत नाही. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे तक्रार करण्यासाठी पुढे यावे, गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.
सदर दोन्ही कारवाया पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, हवालदार उदय टापरे, रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ आणि महिला पोलीस शिपाई भाग्यश्री देवकाते यांच्या पथकाने या दोन्ही मोहिमा अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या.
कोणत्याही गुन्हेगारांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून काढून कायद्यासमोर उभे केले जाईल, असा स्पष्ट इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे. तसेच, नागरिकांनी कोणत्याही दबावाला न बळी पडता तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.




