माळेगाव: जळगांव सुपे (ता. बारामती) येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर अनुसूचित जातीतील व्यक्तीचा कथितपणे जातीय हेतूने अपमान केल्याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे समजल्याने या प्रकरणाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
याबाबत संदीप रमेश खंडाळे (वय ३६, रा. जळगाव सुपे, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या लेखी फिर्यादीनुसार संदीप केशव खोमणे व सुनील दत्तू खोमणे (दोघेही रा. जळगाव सुपे, ता. बारामती) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३(५) आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विविध कलमांनुसार (३(१)(r), ३(१)(s), ३(१)(u), ३(१)(za)(E)) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि एफआयआरमधील नोंदीनुसार, १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.१३ वाजता फिर्यादी संदीप खंडाळे यांनी गावातील ‘आपला गाव, आपला विकास’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात तहसीलदार, बारामती यांना पाठविण्यासाठी तयार केलेले पत्र शेअर केले होते. या पत्रावर सरपंच पदाचे आरक्षण मागास प्रवर्गाला मिळणेबाबत लक्षवेधी चर्चा सुरू असताना, फिर्यादी हे अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही आरोपी संदीप खोमणे याने त्यांना जातीय हेतूने अपमानास्पद शब्द वापरले.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ग्रुपमधील इतर सदस्यांसमोर जातीवरून पाणउतारा करण्याच्या उद्देशाने त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली. तसेच शासनाच्या योजनांवरून अपमानास्पद विधाने करून त्यांच्याविषयी तिरस्कार आणि द्वेषाची भावना निर्माण होईल असे वर्तन केले. या सर्व प्रकारानंतर ग्रुपचे ॲडमिन असलेल्या सुनील खोमणे याने आरोपीला प्रोत्साहन देत फिर्यादी संदीप खंडाळे यांना व्हॉट्सॲप ग्रुपमधून कोणतीही पूर्वकल्पना न देता बहिष्कृत करण्याच्या उद्देशाने काढून टाकले व मुख्य आरोपी संदीप खोमणे याला जाणीवपूर्वक ग्रुप ॲडमिन केले.
सदर घटनेबाबत २३ जून २०२६ रोजी रात्री माळेगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा (गुन्हा क्र. ०१६३/२०२६) दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हे करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा