गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
जळोची ते ओडिशा… सहा महिन्यांचा थरारक तपास! अर्धा टन गांजा तस्करीत मुख्य आरोपीला अखेर बेड्या,आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश, बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

0
8
7
4
7
0
बारामती : जळोची येथील शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तब्बल ४७८ किलो गांजा प्रकरणाचा छडा लावण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. जवळपास सहा महिने चाललेल्या या गुंतागुंतीच्या तपासात पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विकी विजय कांबळे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे ओडिशा ते बारामती आणि सांगलीपर्यंत पसरलेल्या गांजा तस्करीच्या मोठ्या नेटवर्कची पाळेमुळे खणून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणाची सुरुवात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली. जळोची येथील पिंपळी रोडवरील एका शेतात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे दीड हजार लिटर क्षमतेचे दोन मोठे प्लास्टिक ड्रम आढळून आले. या ड्रमची तपासणी केली असता त्यात ४६५ पॅकेट्समध्ये तब्बल ४७८.९५० किलो गांजा सापडला. या गांजाची अंदाजे किंमत २ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिक होती. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळोची येथील शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तब्बल ४७८ किलो गांजा प्रकरणातील मागील व्हिडिओ
या गुन्ह्यात सहा महिन्यांचा सातत्यपूर्ण व सखोल तपास आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत,
गांजा जप्त केल्यानंतर हा माल कोणी आणला आणि कोठे जाणार होता, याचा कोणताही धागा सुरुवातीला पोलिसांकडे नव्हता. मात्र, पोलिसांनी तपास न थांबवता मोबाईल सीडीआर, डंप डेटा, आयएमईआय मॅपिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले. यातून प्रकाश उर्फ पक्या काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग, राहुल गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांची नावे निष्पन्न झाली. यापैकी चार जणांना पोलिसांनी यापूर्वीच गुन्ह्याच्या तपासात अटक केली होती.

तपास जसजसा पुढे गेला, तसतशी या साखळीतील विकी कांबळे याची मुख्य भूमिका स्पष्ट होऊ लागली. त्याचा ओडिशातील जॉकी माझी याच्याशी संपर्क असल्याचे समोर आले. तसेच संग्राम सिंग याच्या भूमिकेबाबतही माहिती मिळाली. त्यामुळे हा केवळ स्थानिक पातळीवरील व्यवहार नसून, यामागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचे बळकट झाले.
तपासादरम्यान विकी कांबळे याच्या हालचालींबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती सांगली पोलिसांना दिली. यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखा व कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून विकी कांबळेला एका इनोव्हा कारसह पकडले. या कारमधून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला.
दरम्यान, २१ मे २०२६ रोजी बारामतीतील गवारे चौकातही पोलिसांनी एका इनोव्हा क्रिस्टा कारवर कारवाई करत २३ किलो गांजा जप्त केला होता. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचे धागेही विकी कांबळे आणि संग्राम सिंग यांच्याशी जुळल्याचे समोर आले. त्यामुळे बारामतीतील दोन्ही गुन्हे आणि सांगलीतील कारवाई मिळून एकूण ६३५ किलोहून अधिक गांजाच्या तस्करीचे धागे एकमेकांशी जोडले गेले.
बारामती शहर पोलिसांनी अखेर गुन्ह्यातील पुराव्यांच्या आधारे विकी कांबळे याचा कायदेशीर ताबा घेत त्याला २ सप्टेंबर रोजी अटक केली. ३ सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.




