Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बापरे! पुरंदर ‘सासवड विमानतळा’च्या कामाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना गंडा; आंतरजिल्हा हायटेक टोळीचा सुपा पोलिसांकडून पर्दाफाश

७७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत: बनावट कंपनी आणि कराराच्या नावाखाली लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

0 4 7 3 2 9

​बारामती (सुपा): पुरंदर सासवड येथे नव्याने होणाऱ्या विमानतळाच्या कामाचे कंत्राट मिळाले असल्याचे भासवून, शेतकऱ्यांचे जेसीबी आणि ट्रॅक्टर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा सुपा पोलिसांनी सिनेस्टाईल पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी तब्बल ७७ लाख रुपये किमतीचे ३ जेसीबी आणि २ ट्रॅक्टर हस्तगत केले असून, मुख्य सूत्रधारांपैकी एकाला गजाआड करण्यात आले आहे.

नांदेड आणि धाराशिव येथील काही शेतकऱ्यांना या टोळीने हेरले होते. “आम्हाला पुरंदर सासवड (पुणे) येथील नियोजित विमानतळाच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे,” असे खोटे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. यासाठी त्यांनी ‘बी.जी. कन्स्ट्रक्शन कंपनी’ नावाची बनावट कंपनी असल्याचे भासवले.

​आरोपींनी फिर्यादी बालाजी गोविंदराव गादेवाड (रा. नांदेड) यांच्यासह अनिल वरखडे, बाबुराव आणि आप्पाराव पांढरे या शेतकऱ्यांशी १०० रुपयांच्या स्टॅम्पवर कायदेशीर वाटावा असा करार केला. “तुमचे वाहन आमच्या कंपनीत कामाला लावतो आणि महिन्याला १ लाख रुपये भाडे देतो,” असे आमिष दाखवून त्यांची वाहने ताब्यात घेतली. मात्र, भाडे देण्याऐवजी ही वाहने परस्पर विकण्याचा त्यांचा डाव होता.

आरोपींनी डिसेंबर २०२५ मध्ये शेतकऱ्यांकडून घेतलेले जेसीबी विक्रीसाठी सुपा (ता. बारामती) येथे आणले होते. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बालाजी गादेवाड यांनी सुपा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी अजय संतोष चव्हाण (सातारा), दिनेश भाऊराव मोरे (नांदेड), निलेश अण्णा थोरात (मोरगाव, बारामती) आणि तुषार शहाजी शिंदे (धाराशिव) यांनी संगनमत करून बी.जी. कन्स्ट्रक्शनचे बनावट कागदपत्रे तयार केली होती.

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी निलेश अण्णा थोरात (रा. मोरगाव) हा वाहनांची विल्हेवाट लावण्याचे काम करत होता. पोलिसांनी त्याला अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, निलेश थोरात याने दोन ट्रॅक्टर मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना, “हे फायनान्स कंपनीने ओढलेले ट्रॅक्टर आहेत, कागदपत्रे आठ दिवसात देतो,” असे सांगून विकले होते.

​सुपा पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत सुपा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील ३ जेसीबी आणि कळंब (धाराशिव) पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील १ ट्रॅक्टर व इतर १ ट्रॅक्टर असा एकूण ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी निलेश थोरात याला न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​सदर दमदार कामगिरी हि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, तपास अधिकारी पो.उप.नि. जिनेश कोळी, तसेच हवालदार राहुल भाग्यवंत, संदीप लोंढे, रुपेश साळुंखे, दत्ता धुमाळ, संतोष पवार, विशाल गजरे आणि पोलीस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंखे, तुषार जैनक, सागर वाघमोडे, निहाल वणवे, सचिन कोकणे, सचिन दरेकर, योगेश सरोदे, पियुष माळी, आदेश मवाळ या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

​पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करत आहेत.

शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून वाहने अनोळखी व्यक्तींच्या ताब्यात देण्यापूर्वी खात्री करण्याचे आवाहन सुपा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज नवसरे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे