Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

“गुगलवर नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे…” रांगेत थांबण्याच्या वादातून मटण दुकानदाराचे सिनेस्टाईल अपहरण; व्हिडीओ कॉलवर लाईव्ह मारहाणीचा थरार!

0 6 4 8 8 8

बारामती: गर्दीच्या वेळी दुकानात रांगेत थांबायला सांगितले म्हणून एकाच्या अहंकाराला असा काही ठेच लागली की, त्याने थेट दुकानदाराचेच अपहरण करण्याचा कट रचला. दोन गाड्या, पाच गुंड आणि व्हिडिओ कॉलवर सुरू असलेल्या आदेशांनी बारामतीत खळबळ उडाली. ‘जय भवानी मटन शॉप’चे मालक ज्ञानेश्वर आटोळे यांच्यावर ओढवलेला हा प्रसंग एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हता.

 

   फ्लॅशबॅक: २१ डिसेंबरचा तो दिवस

सुर्यनगरी येथील ‘जय भवानी मटन शॉप’. रविवारचा दिवस असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली होती. ज्ञानेश्वर आटोळे गिर्‍हाईकांना मटन देण्यात व्यस्त होते. तेवढ्यात एक इसम आला आणि गर्दी न जुमानता पुढे घुसण्याचा प्रयत्न करू लागला. आटोळे यांनी नम्रपणे “साहेब, जरा रांगेत थांबा,” अशी विनंती केली. पण हे शब्द त्या इसमाच्या जिव्हारी लागले.

“मला ओळखत नाहीस? गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे,” अशी मग्रुरी करत त्याने थेट वजनाचा काटा उचलून आटोळे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. वादावादी झाली, तो इसम मटण घेऊन गेला, पण जाताना ऑनलाइन पेमेंट केले. त्यावरून त्याचे नाव स्वागत हनुमंत सोरटे असे समोर आले आहे.

घटनेचा बदला घेण्यासाठी २५ डिसेंबरला सापळा रचला गेला. ज्ञानेश्वर आटोळे हे एका कामगारासह दुकानाबाहेर असतानाच पांढऱ्या रंगाची स्विफ्ट आणि क्रेटा अशा दोन गाड्या तिथे येऊन धडकल्या.

ऋषी गावडे आणि त्याच्या साथीदारांनी काही कळायच्या आतच आटोळे यांना बळजबरीने स्विफ्ट कारमध्ये कोंबले. गाडी सुसाट वेगाने जळोची गावाच्या दिशेने निघाली.

गाडीमध्ये सुरू झाला खरा थरार. आरोपींनी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल लावला. पलीकडे तोच २१ तारखेला वाद घालणारा इसम (स्वागत सोरटे) होता. त्याने स्क्रीनवरूनच आदेश दिला, “मी सांगितले तसेच करा, मला बघू द्या यात किती दम आहे.”

हुकूम मिळताच गाडीतील गुंडांनी आटोळे यांना मारहाण सुरू केली. कोयत्याची मूठ, चामडी बेल्ट आणि हाता-बुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. “तुला आज जिवंत सोडणार नाही,” अशा धमक्यांनी गाडीचा माहोल तापला होता.आरोपी गाडी घेऊन कन्हेरी रोड आणि जळोची ब्रिज परिसरात पोहोचले होते. सुदैवाने, या अपहरणाची कुणकुण पोलिसांना आणि आटोळे यांच्या नातेवाईकांना लागली होती. कोणताही अनर्थ घडण्याआधीच पोलीस आणि फिर्यादीचे भाऊ घटनास्थळी पोहोचले. खाकी वर्दी आणि जमाव पाहून आरोपींचे धाबे दणाणले.

बारामती तालुका पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत मुख्य आरोपींपैकी एक ऋषी गावडे याला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात संकेत मुसळे आणि शितल बेंगारे (रा. पारवडी) यांचीही नावे समोर आली आहेत. ज्या अंहकारातून हे अपहरण नाट्य घडले, त्या मुख्य सूत्रधाराचा आणि इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय चंद्रशेखर यादव, पीएसआय अमोल कदम आणि त्यांच्या पथकाने (युवराज पाटील, कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, मनोज पवार, भारत खारतोडे, दादा दराडे) केली आहे.

इतर कारवाई: याच दरम्यान बारामती तालुका पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात श्रीराज अविनाश चव्हाण (रा. बारामती) यास अटक केली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे