Breaking
अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारामतीचे राजकीय वारसदार नेतृत्वासाठी लायक नाहीत का? स्वतःच्याच वक्तव्यांतून दिली जात आहे नाकर्तेपणाची जाहीर कबुली, मग पोलीस प्रशासनावर खापर कशासाठी!

1 0 3 4 0 5

बारामती : राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या बारामती शहर आणि तालुक्यात तसेच पुणे जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यानंतर बारामती आणि पुण्यातील दरारा व वचक संपला असल्याचा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी थेट पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीत एक अत्यंत गंभीर आणि मूलभूत प्रश्न सामान्य बारामतीकरांच्या मनात निर्माण झाला आहे. ज्यांना स्वतःच्याच जन्मभूमीत आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक ठेवता येत नाही, तीच मंडळी आज स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी पोलीस प्रशासनावर खापर फोडत असल्याची संतप्त चर्चा आता तालुकाभर सुरू झाली आहे.

बारामती हा राजकीयदृष्ट्या अत्यंत समृद्ध आणि ताकदवान तालुका मानला जातो. या एकाच तालुक्याला आज आजी आणि माजी मिळून लोकसभा व राज्यसभेचे अनेक खासदार लाभले आहेत किंबहुना आहेत. तसेच, राज्याचे दिवंगत सर्वांसाठीच सन्माननीय व आदरणीय अजितदादा पवार यांच्या पश्चात आमदार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या रूपाने एक खंबीर नेतृत्व कार्यरत आहे. असे असतानाही, येणाऱ्या काळात स्वतःला बारामतीचे राजकीय वारसदार समजणारी मंडळीच आज स्वतःची पात्रता नसल्यासारखी विधाने करत आहेत. अजितदादा हयात असताना बारामतीत त्यांचा दरारा होता, गुन्हेगारांवर थेट मोक्का लावला जायचा, पुण्यात गुंडगिरी नव्हती आणि आता तशी परिस्थिती राहिलेली नाही दादा असताना असे होते दादा असताना तसे होते, अशी विधाने ही नेतेमंडळी माध्यमांसमोर करत आहेत. यावरून असा थेट प्रश्न निर्माण होतो की, जर तुम्ही त्याच आडनावाचे वारसदार म्हणून भविष्यात तालुक्याची धुरा सांभाळणार असाल आणि तुम्हाला या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्ही या जबाबदारीसाठी आणि नेतृत्वासाठी तुम्ही अजिबात लायक नाही.

स्वतःच्याच असमर्थतेची ही एकप्रकारे जाहीर कबुलीच मानली जात आहे.

कोणतीही गुन्हेगारी घटना ही पोलिसांना पूर्वसूचना देऊन किंवा सांगून घडत नाही. घटना अचानक घडते आणि त्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवत आपले कर्तव्य बजावत असते. बारामती तालुक्यात सध्या कार्यरत असलेले अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे नवीन आलेले आहेत. बाहेरून आलेल्या नवीन अधिकाऱ्यांना तालुक्यातील प्रत्येक गावाची, गल्लीबोळाची किंवा इथल्या सर्व प्रवृत्तींची बारीकसारीक माहिती असतेच असे नाही, तरीही ते कायद्याची अंमलबजावणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. याउलट, याच बारामती तालुक्यात वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी,नेते, पुढारी,म्हणून कार्यरत असणाऱ्या नेत्यांना इथला संपूर्ण भौगोलिक परिसर आणि परिसरातील प्रत्येक लहान-मोठ्या प्रवृत्तीची माणसे तोंडपाठ असतात.(आपल्याकडील भाषेत प्रत्येकाची कुंडली माहिती आहे असे) असताना हे स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर अंकुश का ठेवू शकत नाहीत, हा खरा आणि कळीचा प्रश्न आहे.

स्थानिक राजकारणाच्या गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा पडद्यामागचे कटू वास्तव माहिती नसते. तालुक्यात घडलेल्या कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या गुन्ह्याचा जर सर्व बाजूंनी सखोल तपास केला, तर त्या गुन्ह्यातील आरोपी, त्यांचे नातेवाईक किंवा त्या गुन्ह्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित असणारी लोकं ही तालुक्यातील कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी जोडलेली असतात, हे स्पष्ट होते. आपण अमुक एका मोठ्या पक्षाचे किंवा नेत्याचे कार्यकर्ते आहोत, आपल्या पाठीशी मोठी राजकीय शक्ती आहे आणि आपल्याला कायद्याची कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असा एक चुकीचा अविर्भाव या लोकांमध्ये तयार होतो. आपल्या सोबत एक अदृश्य राजकीय शक्ती आहे व ती आपल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढेल,या भावनेतूनच तालुक्यात गुन्हेगारीला खतपाणी आणि बळ मिळत असते.

पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात किंवा लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात किंवा त्यांच्या बगलबच्च्यांच्या परिसरात एखादी घटना घडली की, हीच लोकप्रतिनिधी किंवा किंवा त्यांचे राजकीय समर्थक अशी मंडळी सर्वात आधी पोलीस ठाण्यात फोन करून ही आमची माणसे आहेत, त्यांना जरा सहकार्य करा, असा दबाव आणतात. अशा राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांचे हात बांधले जातात आणि त्यांच्यावर कामाच्या मर्यादा येतात. मात्र, जेव्हा एखादी परिस्थिती या नेत्यांच्या आवाक्याबाहेर जाते किंवा प्रकरण अंगलट येते, तेव्हा हीच मंडळी या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असा मोठा बाऊ करून थेट पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला मोकळी होतात. हा दुटप्पीपणा आता सुज्ञ नागरिकांच्या लक्षात येऊ लागला आहे.

सध्या सुरू असलेल्या राजकीय वक्तव्यांमधून तर या नेत्यांमधील विसंगती स्पष्टपणे समोर आली आहे. पुणे येथे न्यायालयाच्या परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या काळात पुण्यात गुंडगिरी नव्हती असे म्हणत पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे अशी मागणी केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाले तर ते शहराचे वाटोळे करतील असे विधान करत सुनेत्रा पवार यांना पालकमंत्रिपद सांभाळता येत नसल्याची टीका केली. यावरून राजकीय वाद वाढल्यानंतर त्यांनी सारवासारव करत माफी मागितली, पण अजितदादांची सर त्यांना नाही ही भूमिका कायम ठेवली. दुसरीकडे, युगेंद्र पवार यांनीही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत बारामतीत ड्रग्ज, कोयता गँग, खून, उद्योजकांवर गोळीबार, खंडणी आणि महिलांच्या असुरक्षिततेच्या घटना वाढल्याचा आरोप केला. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि शेजारच्या जिल्ह्यातील प्रतिनिधित्व करणारे परंतु जन्माने बारामतीकर असलेले आमदार नेते आज दुसऱ्याच्या घरात राहून स्वतःच्याच घरावर चिखलफेक करत आहेत आणि बारामतीची सुसंस्कृत ओळख व पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करत आहेत.

या निमित्ताने आता टीका करणाऱ्या या नेत्यांच्या स्वतःच्या योगदानाचाही परखड हिशोब बारामतीकर मांडू लागले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी नेमका किती संपर्क आहे आणि त्यांनी आजवर तालुक्यात कोणती ठोस विकासकामे केली आहेत, हाच मुळात एक मोठा संशोधनाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या असल्या, तरी आज ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या खासदार नेमक्या कोण आहेत असा प्रश्न विचारला, तर त्यांना उत्तर देता येणेही कठीण व्हावे अशी विदारक परिस्थिती पाहायला मिळते.

दुसरीकडे, ज्यांची जन्मभूमी बारामती असली तरी राजकीय कर्मभूमी दुसऱ्या जिल्ह्यात आहे असे नेते आणि तालुक्यात आत्ता कुठे नव्याने स्वतःचे राजकीय अस्तित्व उभे करू पाहणारे नेतृत्व यांचे बारामतीच्या विकासात नेमके किती मोठे योगदान आहे, हे सुज्ञ बारामतीकर जनता चांगलीच जाणून आहे. केवळ त्यांच्याकडून वैयक्तिक राजकीय फायदा उकळणारे मूठभर समर्थक सोडले, तर सर्वसामान्य जनतेच्या मनात या नेतृत्वाच्या कामाबद्दल मोठे प्रश्नचिन्ह आहे. स्वतःच्या कामाचा कोणताही ठोस लेखाजोखा नसताना केवळ माध्यमांसमोर येऊन दुसऱ्यांच्या नेतृत्वावर आणि पोलीस प्रशासनावर टीका करणे कितपत योग्य आहे, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री, राज्यसभेचे खासदार पार्थ पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी अजितदादांप्रमाणेच तालुक्यात दर आठवड्याला, विशेषतः शनिवार आणि रविवारी दरबार भरवून सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठका घेणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्व प्रशासनातील अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाशी थेट संपर्क ठेवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना सक्त सूचना दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर बारामतीच्या पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम करावे. गुन्हा करणारा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, तरी त्याच्यावर अजितदादांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कठोर कारवाई करून त्याची थेट तुरुंगात रवानगी करावी. सर्वसामान्यांना एक न्याय आणि पुढाऱ्यांना वेगळा न्याय, अशी दुजाभावाची भूमिका न घेता सर्वांसाठी कायदा समान राबवावा.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तडजोडीची प्रकरणे न करता किंवा इतर गोष्टींत न अडकता, समाजात कायद्याचा धाक राहील अशा पद्धतीने काम करावे. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणे ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे.

वास्तविक पाहता, गुन्हेगारी ही केवळ बारामती शहर आणि तालुक्यातच वाढलेली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी केला जाणारा वापर, सोशल मीडियाचा चुकीचा प्रभाव आणि वाढती व्यसनाधीनता ही यामागची गंभीर सामाजिक कारणे आहेत. या सर्व परिस्थितीला केवळ पोलीस प्रशासनच जबाबदार आहे असे म्हणणे किंवा लगेचच राज्याच्या गृहमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकीय पोळी भाजून घेणे अजिबात योग्य नाही. ही परिस्थिती नेमकी का उद्भवत आहे आणि तरुण पिढी गुन्हेगारीकडे का वळत आहे, यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गांभीर्याने विचारमंथन होणे ही आजची खरी गरज आहे. केवळ एकमेकांवर टीका करून आणि पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि शासन यांनी एकविचाराने, समन्वयाने आणि राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून काम केले, तरच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी मार्ग निघू शकतो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे