बारामती : बारामती शहर आणि परिसरात फोफावलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. सलग चार दिवस राबवलेल्या या कारवाईत अनेक अवैध दारूचे अड्डे आणि घरगुती भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या ‘ऑल आऊट’ कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट झाली आहे.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुणवडी, बांदलवाडी, आमराई आणि आजूबाजूच्या परिसरात एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ड्रम, भांडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, मोठ्या प्रमाणावर तयार केलेली दारू हस्तगत करून ती जागीच नष्ट करण्यात आली. यामुळे अवैध व्यवसायांना मोठा हादरा बसला आहे.
अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी गेल्या चार दिवसांत पोलिसांनी विशेष पायी पेट्रोलिंग मोहीम राबवली. यामध्ये गुणवडी, बांदलवाडी, आमराई, पिंपळी, लिमटेक, कसबा आणि साठेनगर या भागात फिरून पोलिसांनी घरगुती हातभट्ट्यांचा नायनाट केला आणि दारू गाळण्याची साधने नष्ट केली.
केवळ दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. गावोगावी जनजागृती मोहीम राबवून महिला वर्गाशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी अवैध दारूमुळे कुटुंबावर आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत दारूबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, परंपरागत हा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी पर्यायी उपजीविकेकडे वळण्याचे भावनिक आवाहनही पोलिसांनी केले आहे.
पोलीस निरीक्षकांचा कडक इशारा
“शहरात अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम यापुढेही अत्यंत कठोरपणे सुरू राहील. कोणताही बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही,”असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिला आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित बारामती शहर पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई पार पडली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक (PSI) रत्नदिप भंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) संदीप जाधव, पोलीस हवालदार यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, तसेच महिला पोलीस शिपाई सीमा निंबाळकर, राजश्री जगताप आणि पोलीस शिपाई अमोल देवकाते, अक्षय सिताफ, विशाल शिंदे, विजय ओमासे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलिसांच्या या आक्रमक आणि प्रभावी भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात असून, परिसरातील अवैध धंद्यांना कायमचा आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा