Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बँकेतून पैसे काढून घरी जाणाऱ्या एका नागरिकाला ५० हजारांना गंडवणारा भामटा गजाआड. वडगाव निंबाळकर पोलिसांकडून भामट्याला अटक.

1 0 1 8 4 2

बारामती : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बँकेतून पैसे काढून घरी जाणाऱ्या एका नागरिकाला नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने ५० हजार रुपयांना गंडवणाऱ्या भामट्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सरफराज मानू इराणी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोमेश्वरनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून फिर्यादी हे दिवाळीच्या खरेदीसाठी ५५ हजार रुपये काढून घरी चालले होते. बँकेत पैसे मोजत असतानाच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्यावर पाळत ठेवून होती. फिर्यादी गाडीवरून घरी जात असताना एका काळ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या या व्यक्तीने त्यांना वाटेत थांबवले. तुमच्या खिशातील नोटा खराब आहेत, त्याऐवजी मी तुम्हाला चांगल्या नोटा बदलून देतो असे सांगून या भामट्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडील ५० हजार रुपयांची रक्कम हातात घेऊन हातचलाखी करत आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला.

या घटनेची नोंद झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपास करून सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय सरफराज मानू इराणी याला पोलिसांनी शिताफीने अटक केली.

ही धडक कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सादिक इनामदार करत आहेत. या तपासकामात पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार नितीन तांबे, किरण शेलार, पोलीस शिपाई नरेंद्र यादव, आबा जाधव, निलेश जाधव, सचिन घाडगे, सूरज धोत्रे आणि विकास येटाळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

सणासुदीच्या काळात बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. कोणीही पैसे बदलून देण्याच्या किंवा तपासून देण्याच्या बहाण्याने जवळ आल्यास सावध राहावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे