Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सासवडमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक; गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवारीसह ७ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

0 9 3 4 8 8

सासवड : पुरंदर तालुक्यातील मोर्या सोसायटी येथे सासवड पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. शुभम राजपुरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवारीसह तब्बल ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीवर मोक्कासह खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे १६ गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत. त्याला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम राजपुरे (रा. मोर्या सोसायटी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्या गाडीमध्ये पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी मोर्या सोसायटी येथे पथकासह जाऊन त्याला ताब्यात घेतले. दोन पंचांसमक्ष त्याच्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी ब्रेझा (एम.एच. १२ टी.एन. ८९३०) गाडीची झडती घेण्यात आली. त्यावेळी गाडीच्या डॅशबोर्डच्या खालील कप्प्यात हत्यारे लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.

या कारवाईत पोलिसांनी गाडीतून ६० हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बॉडीचे गावठी पिस्तूल, ९ हजार रुपयांचे दोन मॅगझीन, ७ जिवंत काडतुसे (७.६५ मिमी) आणि २ हजार रुपये किमतीची ३ फूट लांबीची स्टीलची तलवार जप्त केली आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली ७ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी ब्रेझा गाडी असा एकूण ७ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी शुभम राजपुरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत तब्बल १६ गंभीर गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहेत.

या ताज्या प्रकरणी त्याच्याविरोधात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८७/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३, ४, २८ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९८९ चे कलम ३७(१)(२), ९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे