ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
कोऱ्हाळे बुद्रुक येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य; ७ जणांवर गुन्हा दाखल

0
9
1
8
9
6
बारामती: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बीच्या तालावर अश्लील हावभाव आणि बिभस्त नृत्य केल्याप्रकरणी तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील ७ जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन महिला नृत्यांगणांसह डॉल्बी मालक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील माळशिकारेवाडी (मतकर वस्ती) मधील श्री साई समर्थ तरुण मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर (MH 42 Q 2644) आणि त्याला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये (MH 42 BS 2120) डॉल्बी लावला होता. या डॉल्बी संगीताच्या तालावर महिला नृत्यांगणांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव आणि बिभस्त नृत्य करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे मंडळाचे पदाधिकारी आणि संबंधित व्यक्ती या प्रकाराला प्रोत्साहन देत होते.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या अध्यक्षांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ नुसार नोटीस देण्यात आली होती. मात्र, या नोटीसमधील नियमांचे आणि निर्देशांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली.
याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील राधा संग्राम घुले (वय २९), मिनाक्षी बापुराव रुपनवर (वय ३५), काजल नितीन शिंदे (वय २६) या तीन महिलांसह सातारा जिल्ह्यातील फलटण (गोखळी) येथील डॉल्बी मालक रोहित हणमंत धुमाळ आणि बारामती तालुक्यातील माळशिकारेवाडी (कोऱ्हाळे बुद्रुक) येथील राहुल दिलीप माळशिकारे, दिपक सुभाष माळशिकारे, निखील जालिंदर माळशिकारे अशा एकूण ७ जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात (गु.र.नं. १९०/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९६, २२३, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११० आणि ११७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजहर मुलाणी हे करत आहेत.
दरम्यान, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासन आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांनी केले आहे.



