सोमेश्वर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, यातील पहिला निकाल हाती आला आहे. या निकालात ‘श्री सोमेश्वर विकास मंच अजित दादा पवार पॅनेल’ने दमदार सुरुवात करत ‘ब’ वर्ग गटातील जागा जिंकली असून निवडणुकीत आपले खाते उघडले आहे. या जागेवर अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम तानाजी सोरटे यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली आहे.

या निकालाची अधिकृत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. संभाजी होळकर यांनी सांगितले की, “सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत अजित दादा पवार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. ‘ब’ वर्ग जागेसाठी एकूण १३० मतदान झाले होते. या मतमोजणीत आमचे उमेदवार संग्राम भाऊ सोरटे यांना ९४ मते मिळाली, तर विरोधी उमेदवाराला केवळ ३७ मतांवर समाधान मानावे लागले. यामध्ये आमचा उमेदवार ५५ मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाला आहे.”
संपूर्ण बारामती अजितदादांच्या पाठीशी खंबीर – संग्राम सोरटे
विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘ब’ वर्गाचे विजयी उमेदवार संग्राम तानाजी सोरटे यांनी सर्व मतदार, कार्यकर्ते आणि संस्था प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले, “सुनेत्रा वहिनी पवार आणि खासदार पार्थ दादा पवार यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होत आहे. आम्ही २१-० अशा फरकाने सर्व जागांवर विजय मिळवू. या पहिल्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की, संपूर्ण बारामती आणि येथील मतदार सुनेत्रा वहिनी आणि अजित दादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.”
”जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत अजितदादांचे नाव कायम राहील”
पुढे बोलताना सोरटे यांनी आपल्या नेत्यांबद्दलची निष्ठा व्यक्त केली. “जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत अजित दादा, त्यांचा परिवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे नाव कायम राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपला हा विजय आदरणीय अजित दादा पवार यांच्या चरणी समर्पित करत असल्याचे सांगून त्यांनी सुनेत्रा वहिनी, पार्थ दादा आणि जय दादा पवार यांचे विशेष आभार मानले.
या पहिल्या निकालानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, आगामी सर्व जागांवरही आपले पॅनेल अशाच मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा