Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

बारामती पोलिसांच्या कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण, एक कॉल आणि तीन मिनिटांत पोलीस हजर! डायल 112 च्या प्रभावी अंमलबजावणीत बारामती पोलिसांची राज्यात चमकदार कामगिरी.

0 8 7 4 3 8

बारामती : संकटाच्या वेळी नागरिकांनी मदतीसाठी 112 डायल केल्यावर अवघ्या काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतात, हा केवळ एक दावा नसून बारामती उपविभागातील पोलिसांनी तो आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे. 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या बारामती उपविभागाने गेल्या दोन महिन्यांत डायल 112 वर आलेल्या 1,005 आपत्कालीन कॉल्सवर 100 टक्के कार्यवाही करत नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे.

​अत्यंत तत्पर आणि जबाबदार पोलीस खात्याचे दर्शन घडवताना, बारामती तालुका पोलिसांनी मदतीसाठी आलेल्या कॉलवर अवघ्या 3 मिनिटे आणि 01 सेकंदात पोहोचण्याचा विक्रम नोंदवला आहे. राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा (शहरी भागात 15 आणि ग्रामीण भागात 20 मिनिटे) हा प्रतिसाद वेळ अनेक पटींनी वेगवान आहे.

​बारामती तालुक्यातील सर्वच पोलिसठाण्यात माणूष्यबळाची संख्या विचारत घेता सर्वाधिक ताण आहे,तरीही पोलीस आपल्या कामात अधिक तत्परतेने कर्तव्य बजावत असल्याचे दिसत आहे.

जुलै आणि ऑगस्ट 2026 या दोन महिन्यांच्या कालावधीत एकट्या बारामती शहर पोलीस ठाण्यातून सर्वाधिक 521 कॉल्स आले. 

शहरी भागातील वाहतूक, गर्दी आणि मोठे कार्यक्षेत्र असूनही बारामती शहर पोलिसांनी प्रत्येक कॉलवर कार्यवाही केली आणि त्यांचा सरासरी प्रतिसाद वेळ केवळ 3 मिनिटे 36 सेकंद इतकाच राहिला. याशिवाय माळेगाव (3 मिनिटे 22 सेकंद), सुपा (4 मिनिटे 40 सेकंद) आणि वडगाव निंबाळकर (5 मिनिटे 15 सेकंद) येथील पोलिसांनीही उत्तम कामगिरी नोंदवली आहे.

बारामती पोलिसांसाठी 112 ही सेवा केवळ ‘कॉल अटेंड करून घटनास्थळी पोहोचण्यापुरती’ मर्यादित राहिलेली नाही. आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि आवश्यक तेथे कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करण्याची जबाबदार भूमिका घेतली आहे. याच तत्परतेमुळे गेल्या दोन महिन्यांत 112 वरून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने 27 अदखलपात्र गुन्हे (एनसी) आणि 5 प्रकरणांमध्ये थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही आकडेवारी पोलिसांच्या व्यावसायिक कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली ही एकसंध प्रतिसाद यंत्रणा उभी राहिली आहे. अधिकारी, अंमलदार आणि डायल 112 प्रतिसाद पथकांच्या उत्तम समन्वयामुळेच “संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरित व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ” हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ध्येय बारामतीत प्रत्यक्ष फिल्डवर यशस्वी होताना दिसत आहे.

पोलिसांचे ​नागरिकांना आवाहन

अपघात, महिला व बालकांची सुरक्षा, जीविताला धोका, गंभीर वाद किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी न घाबरता 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, ही सेवा खऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी असल्याने नागरिकांनी तिचा अत्यंत जबाबदारीने वापर करणे अपेक्षित आहे.

​तुमचा कॉल हा पोलिसांसाठी केवळ एक क्रमांक नसून, संकटातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची ती एक महत्त्वाची जबाबदारी आहे, हे बारामती पोलिसांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे