गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून, शिक्रापूर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत गुन्ह्याची उकल

0
8
0
4
5
7
शिक्रापूर: येथील करंजेनगर परिसरातील एका मोकळ्या मैदानात तरुणाचा मृतदेह पोत्यात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचे गूढ अवघ्या काही तासांत उलगडले आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून रूममेटनेच आपल्या मित्राचा गळा दाबून खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ ते २६ जुलै दरम्यान घडली. २६ जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील झुडपात एका पोत्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृताची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर केला आणि गुप्त बातमीदारांना कामाला लावले. काही वेळातच मृताची ओळख पटली.
पुढील तपासात पोलिसांना समजले की, गौरव हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे (वय १९) आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत एकाच रूममध्ये राहत होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुकेश आणि जान्हवीला ताब्यात घेतले.


