गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार कुकरीसह दोघे अटकेत; माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई

0
7
1
4
0
3
बारामती : ९ जून २०२६ पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात माळेगाव पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार कुकरीसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेल्या कारसह एकूण ३ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांना कऱ्हावागज (ता. बारामती) हद्दीतील तुकाई चौकाजवळील एका बंद पत्र्याच्या शेडसमोर संशयित तरुण कारमध्ये शस्त्र घेऊन बसला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने कार चालू करून पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अडवून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गणेश तात्याराम गावडे (वय २० वर्षे, रा. कऱ्हावागज, ता. बारामती, जि. पुणे – मुख्य आरोपी) आणि मयुर विष्णू मोरे (रा. मेढद, ता. बारामती, जि. पुणे – शस्त्र विक्री करणारा आरोपी) अशी आहेत. आरोपी गणेश गावडे याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस आणि गाडीच्या ड्रायव्हर सीटखाली धारदार कुकरी मिळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील असा आहे: गावठी पिस्तूल (सिल्व्हर रंग, मॅगझिनसह, किंमत ₹ ३०,०००/-), जिवंत काडतूस (७.६५ KF, किंमत ₹ ३००/-), धारदार कुकरी (लोखंडी पाते, किंमत ₹ ५००/-) आणि चारचाकी वाहन (Hyundai Asta Nios Grand, किंमत ₹ ३,००,०००/-). एकूण जप्त मुद्देमाल ₹ ३,३०,८००/- इतका आहे.




