Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठळक बातमी: बारामतीत पोलिसांचा मध्यरात्री धाडसी छापा; अवैध कत्तल उधळली, १७ गोवंशांना जीवदान!

0 6 3 8 6 0

बारामती : बारामती शहर पोलिसांनी मळद-फलटण रोडवरील गोकुळनगर परिसरात मध्यरात्री अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी छापा टाकून अवैध गोवंश कत्तल उधळून लावली आहे. या धडक कारवाईत १० गायी आणि ७ बैल अशा एकूण १७ जनावरांची सुटका करण्यात आली असून, सर्व जनावरांना सुरक्षिततेसाठी मळद येथील दयोदय गोशाळेत हलवण्यात आले आहे. पोलिसांची गाडी पाहताच अंधाराचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (रजि. नं. १५०/२०२६) दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र गोवंश वध निबंधन व गोवंश संवर्धन अधिनियम, २०१५ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, १९६० च्या विविध कलमांन्वये ही कायदेशीर कारवाई सुरू आहे.

फरार आरोपींची नावे निष्पन्न करण्याचे काम वेगाने सुरू असून, त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जात आहे. जर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आढळले, तर त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा) अंतर्गत अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही धडक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोवंश कत्तल आणि प्राण्यांवरील क्रूरता यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश यातून देण्यात आला आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई पार पाडली. या पथकामध्ये पो. उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, सहाय्यक पो. उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार संजय जाधव, यशवंत पवार, तसेच पोलीस शिपाई अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, ऋषिकेश जाधव व सुरज घाटे यांचा सहभाग होता.

गोवंश हत्या, अवैध वाहतूक किंवा प्राण्यांवरील क्रूरतेचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना गोशाळेत आवश्यक आहार, पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे