Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जनतेच्या आरोग्याशी खेळ! वीजचोरी आणि बोगस कारभारातून गब्बर झालेल्या बारामतीतील दूध माफियांवर कारवाई कधी?

एफडीए आणि प्रशासनाचे बारामतीतील दूध संकलन केंद्रांकडे सोयीस्कर दुर्लक्ष! मागील कित्येक वर्षांच्या काळ्या कमाईची तात्काळ चौकशी करा.

0 7 7 9 7 9

बारामती: पुणे जिल्ह्यातील मंचर आणि इतर भागात बनावट दूध निर्मिती करणाऱ्या रॅकेटचा अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. मंचरमध्ये झालेल्या या मोठ्या कारवाईत अनेक आरोपींना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, याच वेळी बारामती तालुक्यातील मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि दूध प्रक्रिया संघांच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष का केले जात आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. एका विशिष्ट राजकीय कृपाशीर्वादाने आजपर्यंत सुरू असलेल्या या दूध माफियांच्या साम्राज्याची आणि त्यांनी गोळा केलेल्या बेहिशोबी मालमत्तेची सखोल चौकशी होण्याची तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.

ज्या लोकांना दुधातील आणि दुग्धव्यवसायातील ओ की ठो समजत नाही, अशी लोकं आज या व्यवसायातून अतिश्रीमंत झाली आहेत. केवळ दूध संकलनाच्या माध्यमातून यांनी करोडो रुपयांची माया जमवली आणि याच व्यवसायातून इतर अनेक मोठे व्यवसाय उभे केले. आज हीच लोकं अतिश्रीमंत झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे, ज्या सामान्य शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या जीवावर हे मोठे झाले, आज त्यांनाच ते कमी लेखत आहेत आणि त्यांच्याशी अरेरावीची भाषा करत आहेत. अशा वेळी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स) कोणत्या अदृश्य कृपाशीर्वादाने यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा संतप्त प्रश्न बारामतीतील नागरिक विचारत आहेत.

सध्या संपूर्ण राज्यात अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभाग पूर्ण ताकतीने कामाला लागला असून, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीशी तडजोड न करण्याच्या भूमिकेत आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे राज्यभरातील दूध माफियांचे धाबे दणाणले आहेत. बारामतीतही आज ना उद्या कारवाई होईल हे निश्चित आहे, परंतु या माफियांनी आजपर्यंत चुकीच्या पद्धतीने काम करून जी अफाट माया जमवली आहे, त्याचे काय होणार? स्थानिक प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा यांनी विशिष्ट लोकप्रतिनिधींशी संधान बांधून या सर्व गैरप्रकारांना आजपर्यंत पाठीशी घातले आहे. याच संगनमतामुळे ही काळी माया जमवली गेली आहे. आता या भ्रष्ट साखळीवर आणि त्यांच्या संपत्तीवर कोण आवाज उठवणार, हा खरा प्रश्न आहे.

एक सामान्य शेतकरी आणि गोपालक रात्रंदिवस एक करून, आपल्या गोठ्याचे आणि जनावरांच्या आहाराचे योग्य नियोजन करून ५, १०, ५० ते १५० लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन करतो. हा गोपालक अत्यंत प्रामाणिकपणे नजीकच्या केंद्रावर दूध घालतो. मात्र, हे दूध संकलन करणारे चालक पैशांचा जुगाड करून, शेतकऱ्यांना उचल देण्याचे आमिष दाखवून इतर डेअरींचे दूध स्वतःकडे वळवतात. अनैतिक मार्गाने स्वतःच्या डेअरीचे संकलन वाढवतात आणि पुढे हेच दूध मोठ्या संकलन केंद्रांवर व प्रक्रिया संघांकडे चढ्या दराने पाठवले जाते. यात दुधाचा दर हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. या संपूर्ण साखळीत प्रत्येक वर्षी चुकीच्या पद्धतीने कामे करून या लोकांनी प्रचंड माया गोळा केली आहे. जनतेच्या आरोग्याशी यांना कोणतेही देणेघेणे नाही. केवळ आपली पैशांची भूक भागवणे एवढेच यांचे ध्येय आहे.

याशिवाय स्थानिक पातळीवर हे डेअरी चालक आणखी एका गंभीर गुन्हेगारीत सामील असल्याचे उघडकीस येत आहे. सध्या दूध वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र, ही वाहने चार्ज करण्यासाठी दूध संकलन एकत्र आणलेल्या ठिकाणी महावितरणच्या थेट तारांवर आकडे टाकून राजरोसपणे वीज चोरी केली जात आहे. व याकडे महावितरण कर्मचारी व अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे,आणि धक्कादायक बाब म्हणजे, या दूध संकलन करणाऱ्या बहुतांश वाहनांकडे आणि वाहन चालकांकडे कोणताही अधिकृत परवाना नाही. अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या या कारभारामुळे महावितरणसह संपूर्ण यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.

मंचरमध्ये जर दूध भेसळ प्रकरणी कठोर कारवाई होऊन आरोपींना कोठडी सुनावली जाऊ शकते, तर बारामती तालुक्यात कारवाई का होत नाही? आजवर या लोकांवर कारवाई का झाली नाही किंवा का केली जात नाही, हा खरा प्रश्न आहे. प्रशासनाने, महावितरणने, अन्न व औषध प्रशासनाने आणि यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थांनी या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवावे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि बेकायदेशीर संपत्ती गोळा करणाऱ्या या दूध माफियांवर कडक कारवाई करून त्यांच्या मुळापर्यंत सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी आता जनतेतून होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे