Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक

बसमध्ये सापडलेले दागिने आणि रोख रक्कम पोलिसांच्या स्वाधीन; युवक-युवतीने जपला प्रामाणिकपणाचा आदर्श

0 7 1 8 8 3

बारामती : आजच्या वेगवान आणि अनेकदा स्वार्थी मानल्या जाणाऱ्या युगातही समाजात प्रामाणिकपणा आणि नैतिकता जिवंत असल्याचा प्रेरणादायी प्रत्यय बारामतीमध्ये आला आहे. एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सापडलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम स्वतःकडे न ठेवता, दोन तरुण प्रवाशांनी थेट पोलीस स्टेशन गाठून हा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन करत समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.

​सविस्तर माहितीनुसार, सौ. गौरी अनिल दाने (वय २६) आणि श्री. गौरव आसलकर हे दोघे अहिल्यानगर आगाराच्या बसमधून (क्र. MH 14 BT 3491) प्रवास करत होते. बसने फलटण बसस्थानक सोडल्यानंतर प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली होती. काही वेळाने जाग आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, दोन सीटच्या मधोमध एक छोटे पाकीट पडलेले आहे. त्यांनी ते पाकीट उघडून पाहिले असता, त्यामध्ये ६,००० रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे असल्याचा संशय असलेले दोन कानातील झुमके आढळून आले.

​अशा परिस्थितीत मोहापोटी अनेकांनी हा ऐवज स्वतःकडे ठेवला असता. मात्र, सौ. गौरी दाने आणि श्री. गौरव आसलकर यांनी अत्यंत नागरिकत्वाचे भान ठेवत, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून हा मुद्देमाल बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये आणून स्वखुशीने जमा केला. या पाकिटाचा खरा मालक शोधून योग्य त्या खातरजमेनंतर त्याला हा ऐवज परत मिळावा, या उदात्त हेतूने त्यांनी ही कृती केली.

​बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांनी या दोघांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, समाजातील इतर नागरिकांनीही सापडलेली मालमत्ता योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासनास असेच सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

​या घटनेमुळे समाजात आजही परस्परांतील विश्वास, नैतिक मूल्ये आणि सामाजिक सलोखा टिकून असल्याचे अधोरेखित झाले आहे. या युवक-युवतीने दाखविलेली प्रामाणिकता ही केवळ एक कृती नसून, समाजातील नैतिक मूल्यांचे जतन करणारा एक उत्कृष्ट आदर्श आहे. या सजग नागरिकांमुळेच समाज अधिक सुरक्षित आणि सुसंस्कृत बनत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे