बारामती : पतंग उडविण्याचा आनंद काही क्षणांचा असतो; मात्र त्यासाठी वापरण्यात येणारा धारदार नायलॉन किंवा सिंथेटिक मांजा रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या, लहान मुलांच्या आणि पशू-पक्ष्यांच्या जीवावर बेतू शकतो. हा केवळ दोर नसून निष्काळजी हातात तो एक ‘जीवघेणा सापळा’ ठरू शकतो. याच गंभीर धोक्याची दखल घेत, बारामती शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुद्ध कठोर मोहीम उघडली असून एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांचा सापळा आणि कारवाई: बारामती शहर व परिसरात नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री व साठवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३५ च्या सुमारास गुणवडी गावच्या हद्दीतील वायसेवस्ती येथे तपास पथकाने तातडीने सापळा रचला.
या धडक कारवाईत ओम गणेश वायसे (वय २४ वर्षे, रा. गुणवडी वायसेवस्ती, ता. बारामती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून वेगवेगळ्या रंगांचे प्रतिबंधित नायलॉन मांजाचे १६ नग रील (प्रत्येकी अंदाजे ४०० रुपये) असा एकूण ६,४०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गिरीश नेवसे यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर करत आहेत.
न्यायालयाचे कडक निर्देश आणि दंडात्मक कारवाई: जानेवारी २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने या समस्येची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. केवळ किरकोळ विक्रेते नव्हे, तर नायलॉन मांजाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि ऑनलाइन पुरवठा करणारी संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
तसेच, नागपूर खंडपीठाच्या स्वतंत्र आदेशानुसार कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे: १. वापरकर्त्यास: २५,००० रुपये दंड. २. विक्रेत्यास (साठा आढळल्यास): २,५०,००० रुपये दंड. ३. अल्पवयीन मुलाचा सहभाग: जर अल्पवयीन व्यक्तीने नायलॉन मांजा वापरला, तर तो दंड त्यांच्या पालकांकडून वसूल करण्यात येईल.
‘साठा लपवला तरी सुटका नाही’ – पोलिसांचा इशारा
दुकानात उघडपणे न विकता घराच्या आडोशाला, गोदामात किंवा ऑनलाइन माध्यमातून छुप्या पद्धतीने मांजा पुरवणाऱ्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. “मला बंदीची माहिती नव्हती” किंवा “स्वतःच्या वापरासाठी ठेवला होता” अशी कारणे देऊन कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही. उपलब्ध पुराव्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
पालकांना पोलिसांचे विशेष आवाहन:
पालकांनी आपल्या पाल्यांना पतंग उडविण्यासाठी नायलॉन किंवा सिंथेटिक मांजा देऊ नये. त्यांच्या हातातील मांजा कोणता आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. पतंग उडवा, आनंद साजरा करा; पण कोणाच्याही गळ्यावर किंवा पक्ष्यांच्या पंखांवर मृत्यूचा मांजा सोडू नका, असे भावनिक व कायदेशीर आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत इंगवले यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकातील पोलीस हवालदार श्री. ज्ञानदेव क्षीरसागर आणि पोलीस शिपाई श्री. गिरीश नेवसे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा