गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती उपविभागातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई!
वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल; दोन आरोपी जेरबंद, ५,६०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!

1
0
2
0
3
7
बारामती : उपविभागात घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी पेट्रोलिंगच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली असून दोन आरोपींना जेरबंद केले आहे.

दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार बारामती उपविभागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात (गु.र.नं. ३६७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३४, ३०५(अ)) साहिल शेख या आरोपीने त्याच्या साथीदारांसह मानकरवस्ती येथून डीजेचे साहित्य चोरी केल्याची माहिती मिळाली होती. हा आरोपी मेखळी (ता. बारामती) येथील बसस्थानकाजवळ येणार असल्याची खबर मिळताच पथकाने तात्काळ तिथे जाऊन सापळा रचला आणि संशयित इसमास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव साहिल जावेद शेख (वय १९ वर्षे, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांसह तीन मोटारसायकलवरून जाऊन सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात एकूण ९ आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी त्यांनी युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल क्रमांक एमएच-११-सीएफ-४४२७ वापरल्याचे तपासात समोर आले.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून साहिल जावेद शेख आणि त्याचा साथीदार ओम शरद घाडगे (वय २१ वर्षे, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत आरोपींकडून चोरीस गेलेले डीजेचे मशीन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, सहायक फौजदार शिवाजी निकम, आणि पोलीस हवालदार सचिन होळकर, सुलतान डांगे, स्वप्नील अहिवळे, पोपट नाळे, किशोर तेलंग, शैलेष स्वामी, गुलाबराव पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रहीस मुलाणी, तुषार चव्हाण, आणि गणेश डेरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.



