बारामती: शेतात पाणी भरत असलेल्या महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी बारामती येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संगम उर्फ कपिल महादेव नाळे (रा. नेपतवळण, ता. बारामती, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मौजे मेडड (ता. बारामती) हद्दीत ही घटना घडली होती. फिर्यादी महिला त्यांच्या शेतजमीन गट नं. ४१० मध्ये शेतीला पाणी देत असताना त्यांच्या भावकीतील आरोपी संगम नाळे तिथे आला. त्याने फिर्यादीच्या जवळ जाऊन त्यांचा उजवा हात पकडला आणि “तुम्ही मला लय आवडता” असे म्हणत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
या घटनेनंतर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २९०/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार व्ही. आर. मोहोळे (बक्कल नं. १९०१) यांनी करून, आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
बारामती येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मा. पी. एस. भंडारी यांच्या न्यायालयात दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजिंक्यसिंह शिर्के यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले.
साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीने विनयभंग केल्याचा दोष शाबीत झाल्याने न्यायालयाने संगम नाळे याला दोषी ठरवले. त्याला १ वर्षाची सक्तमजुरी व १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर आरोपीने दंड भरला नाही, तर त्याला अतिरिक्त तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागेल, असेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.
सदर प्रकरणात प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार वीरभद्र रामचंद्र मोहोळे, पैरवी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जी. के. कसपटे, सहाय्यक पोलीस फौजदार ए. जे. कवडे (टी.एम.सी शाखा पुणे ग्रामीण) आणि महिला पोलीस अंमलदार कीर्ती कुंभार यांनी मोलाचे सहकार्य केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा