Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नागरिकांच्या सतर्कतेने डीपी चोरट्यांचा पर्दाफाश: शिक्रापूर पोलिसांकडून पाच चोरांना अटक, १७० किलो तांब्याच्या तारांसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

1 0 2 1 3 2

शिक्रापूर : शेतशिवारातील विद्युत रोहित्र (डीपी) रात्रीच्या अंधारात लक्ष्य करून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एका पाच सदस्यीय टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तब्बल आठ डीपी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली असून, आरोपींकडून २ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीच्या १७० किलो तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे डीपी चोरांच्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईची सुरुवात ६ नोव्हेंबर रोजी रात्री झाली, जेव्हा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हवालदार किरण ढुके आणि अंमलदार लहानु बांगर अरणगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी अरणगाव आणि उरळगावच्या शिवेवर विद्युत रोहित्र चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांना स्थानिक नागरिकांकडून मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठांना कळवून परिसरात संशयितांचा शोध सुरू केला. त्यावेळी विनानंबर प्लेटच्या पल्सर मोटारसायकलवरून जाणारे दोघे संशयास्पद दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी वेग वाढवून पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अडविल्यावर दोघांनी अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतात पलायन केले. पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवून सकाळी प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २७) आणि सुनील पोपट केदार (वय २५, दोघे रा. नांदूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सखोल तपासात या गुन्ह्यांमध्ये आणखी तीन साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले. संदीप यशवंत काळे, निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ आणि राजेंद्र सोमनाथ वर्पे अशी या तिघांची नावे असून, पोलिसांच्या दोन पथकांनी त्यांनाही संगमनेर येथून ताब्यात घेतले.

या पाचही आरोपींनी एकत्रितपणे आठ ठिकाणचे डीपी पाडून तारा चोरल्याचे कबूल केले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

विशेष म्हणजे,

या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोलाची मदत करणाऱ्या उरळगावच्या संतोष सात्रस, विनायक सात्रस, लहू हुजगे, निलेश सात्रस, काळुराम चोरमले आणि संजय चोरमले या सहा जागरूक नागरिकांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणाऱ्या या नागरिकांच्या सतर्कतेचे पोलीस प्रशासनाकडून मोठे कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे