Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

लोहगड किल्ल्यावर मृत्यूचा थरार: अपघात नव्हे, तर ‘तिने’ प्रियकराच्या मदतीने घडवून आणला भावी पतीचा खून

0 7 3 9 1 5

पुणे: निसर्गरम्य लोहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. परंतु, या मृत्यूच्या रहस्यावरून आता एक धक्कादायक पडदा उठला आहे. हा अपघात नसून, एका भयंकर कटाचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच, भावी पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने तरुणाला किल्ल्यावरून खाली ढकलून देत त्याचा निर्घृण खून केल्याची थरारक माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे.

केतन विशाल अगरवाल (वय २५, रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची भावी पत्नी सिया प्रविण गोयल (वय २०, रा. मार्केट यार्ड, पुणे) आणि तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
घडलेला प्रकार असा की, १८ जून २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला एका झुडपात केतन अगरवाल याचा मृतदेह आढळून आला होता. केतन आणि सिया यांचे लग्न ठरले होते. त्यामुळे ते दोघे किल्ल्यावर फिरायला गेले होते. त्यावेळी किल्ला फिरताना केतनचा पाय घसरला आणि तो खाली पडून त्याचा मृत्यू झाला, असा बनाव सिया गोयल हिने रचला होता. तिच्या या माहितीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, या प्रकरणातील गुंतागुंत आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांना या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत स्थानिक गुन्हे शाखेला समांतर आणि सखोल चौकशीचे आदेश दिले. या तपासासाठी दोन विशेष पथके नेमण्यात आली.
पोलिसांनी आपला तपास मालमत्तेचा वाद आणि प्रेमसंबंध या दोन बाजूंनी सुरू केला. तपासाचे चक्र फिरताच पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागला. सिया गोयल हिचे चेतन चौधरी या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच दरम्यान, केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत धाव घेत, सिया आणि चेतन यांनी संगनमत करून आपल्या मुलाला किल्ल्यावरून ढकलून मारल्याची फिर्याद २३ जून रोजी दाखल केली.

या नव्या खुलाशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट आरोपी चेतन चौधरी याचा शोध घेत त्याला कोंढवा परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच चेतनने गुन्ह्याची कबुली दिली आणि एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले.
सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. मात्र, घरातून ठरलेल्या या लग्नामुळे तिच्या आणि चेतनच्या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत होता. यातून कायमची सुटका मिळवण्यासाठी या दोघांनी मिळून एक भयानक कट रचला. ठरलेल्या कटानुसार, सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले. तिथे पोहोचल्यावर तिने आपला प्रियकर चेतन याला पाठीमागून बोलावून घेतले. संधी मिळताच दोघांनी मिळून केतनला किल्ल्याच्या कड्यावरून खाली ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

या कारवाईमुळे एका गुंतागुंतीच्या आणि संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीपणे पूर्ण केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे