बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या उमेदवारीला यशवंत सेनेने आपला जाहीर आणि बिनशर्त पाठिंबा घोषित केला आहे. या निर्णयामुळे बारामतीमधील धनगर समाजाची शक्ती सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभी राहिली असून, प्रचारात त्यांना मोठी आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील, उद्योजक संग्राम सोरटे, आणि ज्येष्ठ नेते दत्ता माळशिकारे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपूर्द करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रा. दांगडे पाटील यांनी अजित पवार यांच्या विकासकामांचा गौरव केला. ते म्हणाले की, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा चौफेर विकास करताना सर्व समाजघटकांना सोबत घेतले आहे. विशेषतः सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धनगर समाजाला योग्य प्रतिनिधित्व आणि संधी दिली. बारामतीच्या विकासाची ही गती आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आम्ही सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देत आहोत.”

यशवंत सेना ही राज्यातील धनगर समाजाला एन.टी. (NT) प्रवर्ग आरक्षण मिळवून देणारी महत्त्वाची नोंदणीकृत संघटना आहे. समाजाच्या एस.टी. (ST) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर जो पाठपुरावा केला, त्याची दखल घेत संघटनेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने हा ठराव मंजूर केला आहे. आगामी काळात बारामती मतदार संघातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी यशवंत सेनेचे कार्यकर्ते सक्रिय होणार आहेत. या मोहिमेत नितीन धायगुडे, समाधान पाटील, बाबा भोजने यांसह अनेक दिग्गज पदाधिकारी मैदानात उतरणार आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा