Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई: १४ लाखांचे २९ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत CEIR पोर्टलच्या मदतीने काढला माग; नागरिकांना मोठा दिलासा

0 9 8 3 5 6

शिक्रापूर, दि. १६: हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळण्याची आशा सोडून दिलेल्या नागरिकांना शिक्रापूर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. तांत्रिक तपासाच्या आणि कौशल्याच्या जोरावर पोलिसांनी तब्बल २९ मोबाईल फोन शोधून काढले असून, सुमारे १४ लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल संबंधित मोबाईलच्या मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०२६ या वर्षात मोबाईल हरवण्याच्या आणि गहाळ होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती. या वाढत्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या. पथकातील तांत्रिक विश्लेषणाचे काम पाहणारे पोलीस हवालदार शिवाजी चितारे यांनी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करून या हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू केला. दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे माहिती संकलित करून योग्य ते तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
या शोधमोहिमेत एकूण २९ मोबाईलचा अचूक माग काढण्यात पोलिसांना यश आले. सुमारे १४ लाख रुपये किमतीचे हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

आजच्या काळात मोबाईलमध्ये महत्त्वाची वैयक्तिक माहिती, दैनंदिन व्यवहारांचे तपशील आणि संपर्क क्रमांक असतात. त्यामुळे मोबाईल गहाळ झाल्यावर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, पोलिसांनी तत्परतेने केलेल्या या कारवाईमुळे मोबाईल परत मिळवून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

ही लक्षवेधी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार शिवाजी चितारे, नारायण वाळके आणि विकास नगर यांच्या पथकाने या तपासकार्यात विशेष मेहनत घेतली. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांना तत्परतेने मदत करण्याच्या शिक्रापूर पोलिसांच्या या भूमिकेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे