Breaking
अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीस बनणार जीवनरक्षक, कायदा सुव्यवस्थेसोबतच आता जीव वाचवण्यासाठीही सज्ज; बारामती शहर पोलिसांना सीपीआर व बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण. 

0 8 9 0 6 7

बारामती : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही तातडीने जीवनरक्षक मदत करता यावी, या उद्देशाने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी सीपीआर (CPR) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), बारामती व इंडियन डेंटल असोसिएशन (IDA), बारामती-फलटण शाखेच्या डॉक्टरांच्या टीमने सामाजिक बांधिलकीतून प्रात्यक्षिकांसह हे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले.

​पोलीस अनेकदा अपघात, गर्दी, मिरवणुका किंवा अन्य आपत्कालीन घटनांच्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतात. एखाद्या व्यक्तीला अचानक कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) आल्यास किंवा श्वासोच्छ्वास बंद पडल्यास वैद्यकीय मदत मिळेपर्यंतची सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत निर्णायक असतात. अशा वेळी योग्य पद्धतीने सीपीआर दिल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. या अनुषंगाने डॉक्टरांच्या टीमने पोलिसांना सीपीआरचे महत्त्व, कार्डियाक अरेस्टची लक्षणे कशी ओळखावीत, रुग्णाची प्रतिसादक्षमता तपासण्याची पद्धत, तातडीची वैद्यकीय मदत कशी बोलवावी आणि सीपीआर देण्याची योग्य प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

​गणेशोत्सव, पालखी सोहळे आणि मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये हजारो नागरिक एकत्र येतात. अशा वेळी अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी घटनास्थळी उपस्थित असलेले प्रशिक्षित पोलीस तातडीने प्रथम प्रतिसाद देऊ शकतील, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.

पोलिसांचे काम केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे हेदेखील त्यांच्या सेवाभावाचे महत्त्वाचे अंग असल्याचे यातून अधोरेखित झाले.

हा उपक्रम केवळ पोलीस स्टेशनपुरता मर्यादित न ठेवता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत डॉक्टरांच्या टीमशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. आगामी काळात बारामती शहरातील मार्केट परिसर, एसटी स्टँड, शाळा आणि महाविद्यालये यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी सीपीआर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून अधिकाधिक नागरिकांना ‘प्रशिक्षित प्रथम प्रतिसादक’ बनविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबात किमान एक प्रशिक्षित व्यक्ती तयार व्हावी, हा यामागील व्यापक सामाजिक उद्देश आहे.

​सदर उपक्रम पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने निमा आणि आयडीएच्या सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. गर्दीत कायदा-सुव्यवस्था राखणारे हात गरज पडल्यास जीवन वाचवण्यासाठीही पुढे येतील आणि संकटकाळात पोलीस व डॉक्टर या दोघांचेही ध्येय एकच असेल,असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे