Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगाव निंबाळकर जि. प. शाळांचा अध्यात्मिक उपक्रम, आषाढी वारीनिमित्त रंगला बाल वारकऱ्यांचा पालखी सोहळा.

0 7 8 2 6 8

वडगाव निंबाळकर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर १ आणि २ तसेच दोन्ही शाळा व्यवस्थापन समित्यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या निमित्ताने बुधवारी (दिनांक १५ जुलै) गावात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अध्यात्मिक स्वरूप देत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकांसह समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी या सकारात्मक व संस्कारक्षम उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

हातात पताका, डोक्यावर तुळस, आणि हरिनामाच्या गजरात निघालेल्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण गावातील वातावरण भक्तीमय व आषाढी वारीमय झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात जीवनावश्यक व सामाजिक संदेश देणारे फलक होते.

आकर्षक पालखीचे प्रस्थान गावातील संत सावता माळी मंदिरात झाले. तेथे मुला-मुलींनी, महिलांनी आणि शिक्षकांनी फुगडीचा फेर धरत, तसेच अभंग गायन करत वारीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी काठवट नृत्य आणि विविध भक्तीगीते सादर केली. शारदाबाई पवार ट्रस्ट, शारदानगर (माळेगाव) येथील कृषिकन्यांनी याप्रसंगी ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ असा मोलाचा संदेश दिला. यानंतर ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरास भेट देऊन व विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करून या सोहळ्याची सांगता झाली.

या स्तुत्य उपक्रमात समाजातील अनेक दात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत प्रशासक सुनील ढोले यांच्याकडून शेंगदाणे लाडू, तसेच संत सावतामाळी ट्रस्टचे सदस्य हनुमंत आगम गुरुजी व दत्तात्रय बनकर तसेच पुणे शहर पोलीस दलातील हवालदार लखन लोणकर यांच्याकडून बिस्कीटपुडे वाटप करण्यात आले. श्री.शेखर गिरमे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री.पिंटू किर्वे यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, तर मुख्याध्यापक व शिक्षकांकडून सर्वांना शाबुदाणा खिचडी देण्यात आली.

या सोहळ्याला पंचायत समिती बारामतीचे गटनेते बाबा चोरमले, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, प्रशासक सुनील ढोले, जय मल्हार क्रांती संघटनेचे युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत खोमणे, नितीन खंडाळे, पत्रकार सुशिलकुमार अडागळे, सुनिल जाधव, फिरोज भालदार, क्रीडा शिक्षक मंगेश खोमणे आदी मान्यवर व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा क्र. १ चे व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्निल शिंदे, सदस्य मनिंदर खोमणे, दत्तात्रय नेवसे,समीर आतार, प्रियांका महामुनी, मोहिनी दिक्षित, शुभांगी साळवे, महानंदा गाढवे, सुप्रिया खोमणे, वर्षा पवार, मुख्याध्यापिका अरुणा आगम, उपशिक्षिका मालन बोडरे, सुलोचना कोळी, अनिल गवळी यांनी परिश्रम घेतले. तसेच शाळा क्र. २ च्या अध्यक्षा सौ.स्वाती नवनाथ खोडके, उपाध्यक्ष महेश राऊत, मुख्याध्यापिका सौ.कविता जाधव, उपशिक्षिका सौ.विजया दगडे, सौ.सुनीता पवार, श्रीमती लता लोणकर, राणी ताकवले यांच्यासह सर्व सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.

शाळांनी राबवलेल्या या भक्तीमय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक व सामाजिक मूल्यांची रुजवण होत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंदांनी ग्रामस्थ व पालकांकडून मिळालेल्या या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.

या पालखी सोहळ्यामुळे शाळेतील मुलांचा आनंद द्विगुणित झाला. व त्यांना आषाढी वारी, पालखी सोहळा दिंडी म्हणजे काय याचा अनुभव मिळाला.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे