बारामती : गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या पोक्सो (POCSO) गुन्ह्यातील आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अमर सोमनाथ चव्हाण (वय २६, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या चौकशीतून फलटण येथील मोटारसायकल चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२६ अन्वये दाखल असलेल्या पोक्सो गुन्ह्यात आरोपी अमर चव्हाण हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत असतानाच, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी तो गावात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ हालचाली करत परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस पथकाने त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४२७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली टीव्हीएस कंपनीची ‘टीव्हीएस स्पोर्ट’ (TVS SPORT) ही दुचाकी जप्त केली आहे.
ही धडाकेबाज कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस शिपाई विकास येटाळे, पोलीस शिपाई भानुदास सरक, चालक हवालदार विजय शेंडकर आणि चालक होमगार्ड संदीप कसबे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा