अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
श्रीपती बाबा महाराज विद्यालयात ‘सावित्रीबाई फुले जयंती’ व ‘पोलीस दिन’ उत्साहात; शस्त्रास्त्र प्रदर्शनाने वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष

0
7
1
2
5
7
महाळुंगे : येथील जनता शिक्षण संस्थेचे श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालय येथे आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन (२ जानेवारी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या संयुक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या विचारांची शिदोरी आणि पोलिसांच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनातून देशभक्तीचे धडे मिळाले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि संस्थेचे संस्थापक वंदनीय जयंतराव (दादासाहेब) जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी महाळुंगे गावच्या सरपंच अर्चना महाळुंगकर, उपसरपंच किशोर भालेराव, विद्या भालेराव तसेच महाळुंगे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना सरपंच अर्चना महाळुंगकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच आज स्त्रियांनी शिक्षणाची कवाडे खुली करून गगनभरारी घेतली आहे.” यावेळी त्यांनी शाळेच्या परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावून, शाळेला होणारा त्रास थांबवण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रशालेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. अनुष्का इंगळे हिने सावित्रीबाईंविषयी इंग्रजीतून केलेले भाषण उपस्थितांची दाद मिळवून गेले.
पोलीस दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक भरत करे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये विद्यार्थ्यांना ७.६२ मिमी एसएलआर रायफल (SLR), ९ मिमी पिस्तूल, कार्बाइन, एके-४७ (AK-47) आणि एमपी-५ (MP-5) यांसारख्या शस्त्रांची विस्तृत माहिती देण्यात आली. करे साहेबांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांची तांत्रिक माहिती देतानाच राष्ट्रहित जोपासण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल गणेश महाडीक, नवनाथ लोंढे तसेच दामिनी पथकाच्या विद्या साठे व विद्या बगनर उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत सरपंच अर्चना महाळुंगकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक वाय. जी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आपली कर्तव्ये ओळखून आदर्श नागरिक बनण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कवडे सर यांनी केले, तर आभार ज्येष्ठ शिक्षक श्री. आढाव सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक सौ. पौर्णिमा गिरे आणि शिक्षक प्रतिनिधी श्री. अनिल पाटील, सौ. शेवकरी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.






